दमिश्क - सीरियातील सैनिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात अनेक लोक ठार झाल्याचे वत्त आहे. सीरियामधील सरकारी प्रसारमाध्यमांनी या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा हल्ला तैफूर एअरबेसवर करण्यात आला आहे. त्याआधी शनिवारी पूर्व घौऊतामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्यात 80 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. गृहयुद्ध, दहशतवाद आणि अमेरिका आणि रशियाकडून सतत्याने करण्यात येत असलेल्या हल्ल्यांमुळे सीरिया बेचिराख झाला आहे. सना या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार "तैफूर एअरपोर्टवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. आमची संरक्षण यंत्रणा या क्षेपणास्त्रांना पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. या हल्ल्यात काही जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. मात्र मृत आणि जखमींचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रासायनिक हल्ल्याच्या केलेल्या निषेधानंतर हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी रासायनिक हल्ल्याचा निषेध करताना सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांना इशारा दिला होता. तसेच ट्रम्प यांनी रासायनिक हल्ल्यासाठी रशिया आणि इराणलाही जबाबदार धरले होते. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियातील डोमा या शहरात शनिवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात ८० नागरिक मरण पावले होते. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या हल्ल्यासाठी सायनाइडपेक्षा वीसपट विषारी असलेले सरिन रसायन वापरण्यात आले. हल्ल्यामुळे बाधित झालेल्या लोकांची छायाचित्रे ‘व्हाईट हॅल्मेट रीलिफ आॅर्गनायझेशन’ने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. मृतांमध्ये महिला व मुलांचे प्रमाण अधिक आहे. ब्रिटनने म्हटले की, सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. निरपराध लोकांचा बळी घेतला आहे. हल्ल्याची तत्काळ चौकशी करण्यात यावी. यापूर्वीही अशाच प्रकारचा हल्ला झाला होता.