वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अनौपचारिक चीन दौऱ्यात शनिवारी तेथील वादकांनी त्यांच्या सन्मानार्थ ‘तू तू है वही, दिल ने जिसे अपना कहा’ हे गाणे वाजवले आणि त्यांचे स्वागत केले. त्या गाण्याची धून ऐकून मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या दोघांनी टाळ्या वाजवून कलाकारांचे कौतुक केले.मोदी यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हिंदी गाण्याची धून ऐकून मोदी चकितच झाले. या गाण्याचे वृत्त येताच चित्रपट अभिनेते ऋषिकपूर यांनाही राहवले नाही. त्यांनी १९८२ सालातील आपल्या ‘ये वादा रहा’ या चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओच ट्विटरवर शेअर केला. आशा भोसले व किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणे चीनमध्ये आजही लोकप्रिय आहे.पंतप्रधान मोदी यांच्या या दौºयात चित्रपटांच्या देवाणघेवाणीविषयीही चर्चा झाली. चीनमध्ये अनेक हिंदी चित्रपट पाहिले जातात आणि काही चित्रपट तर खूपच लोकप्रिय ठरले आहे. आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’, ‘दंगल’, सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हे चित्रपट तर तिथे खूपच गाजले आणि या तिन्ही चित्रपटांनी तिथे मोठी कमाईही केली. स्वत: शी जिनपिंग यांनी काही हिंदी व भारतीय चित्रपट पाहिले आहेत.चीनमधील चित्रपटही भारतात पाहिले जावेत, असे शी जिनपिंग यांनी सांगितले आणि त्यास आमची काहीच हरकत नाही, असे मोदी यांनी म्हणाल्याचे कळते. या दोन्ही नेत्यांत बॉलिवुड या विषयावरही काही मिनिटे चर्चा झाली.
मोदी झाले चकित; चीनच्या वादकांनी वाजविले हिंदी गाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 5:23 AM