मोदी-शी जिनपिंग यांची चाय पे चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 06:38 AM2018-04-29T06:38:55+5:302018-04-29T06:38:55+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली.

Modi-Xi Jinping talks on tea! | मोदी-शी जिनपिंग यांची चाय पे चर्चा!

मोदी-शी जिनपिंग यांची चाय पे चर्चा!

Next

वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली. पण या चर्चेत डोकलाम तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मात्र उल्लेख झाला नाही. हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताचा त्यास आक्षेप आहे. या दोघा नेत्यांत या विषयांवर चर्चा झाली नाही, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दोघे नेते सकाळी एकत्र चहा प्यायले. तरुणी चहा तयार करीत असताना मोदी बारकाईने त्याकडे पाहत होेते. नंतर स्वत: हातात चहाची किटली घेऊन मोदी यांनी भारतातील चहाच्या पद्धतीची त्यांना माहिती दिली.
दोन देशांतील संबंध सुधारणे हा मुख्यत: चर्चेचा गाभा होता. परस्पर संवाद, परस्पर विश्वास यांचे वातावरण तयार करताना सीमेवर तणाव कमी व्हावा, या दृष्टीने पावले टाकण्याचे दोघांनी मान्य केले. तशा सूचना दोन्ही देशांच्या लष्करांना दिल्या जातील. दोन्ही लष्करांत सामंजस्याचे संबंध असावेत, असेही ठरले.
नरेंद्र मोदी यांनी विचार, सहकार, सुसंवाद, बांधिलकी तसेच स्वप्नपूर्ती या नव्या पंचसूत्रीचा उल्लेख केला. व्यापारी संबंध सुधारण्यावर दोन्ही नेत्यांत एकमत झाले. दहशतवादाच्या धोक्याविषयीही मतैक्य होते. मात्र पाककडून दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद व आश्रय यांचा चर्चेत उल्लेख झाला नाही. पर्यावरणातील बदलांची दखलही मोदी व शी जिनपिंग यांनी घेतली.

मोदी व जिनपिंग यांनी वुहानच्या ईस्ट लेक तलावापाशी आज मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर दोघांनी त्या तलावात नौकानयनही केले. बोटीच्या वरच्या मजल्यावरून अतिशय स्वच्छ असलेल्या तलावाची पाहणी करताना, मोदी यांनी भारतातील नदी स्वच्छता मोहिमेसाठी चीनकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे सांगितले. गंगा नदी स्वच्छ अभियानाची त्यांना माहिती दिली. वुहान हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.

चौथा दौरा, अनेकदा भेट
मोदी यांचा चार वर्षांतील हा चौथा चीन दौरा आहे. या चार वर्षांत मोदी व शी जिनपिंग यांची अनेकदा भेट झाली. पुन्हा जूनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी मोदी चीनला जाणार आहेत. या दोन नेत्यांतील चर्चा व संबंध सुधारणा यांविषयी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी आनंद व्यक्त केला आहे.

चीन सातत्याने सीमेवर कागाळ्या करीत असतो. तसेच अरुणाचलच्या सीमेवर आपल्या हद्दीत चीनने मोठी बांधकामे सुरू केली आहेत. त्यामुळे अनेकदा तेथून व उत्तराखंडात चिनी सैन्य घुसखोरी करीत असते. काही वेळा चीनची हेलिकॉप्टर्सही भारतीय हद्दीत घुसतात.
पुढील वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या काळात चीनकडून कोणतीही कागाळी होऊ नये, असा पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न आहे. एकीकडे पाकिस्तानकडून हल्ले, अतिरेक्यांची घुसखोरी सुरू असताना चीनकडून अडचणी नकोत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.

Web Title: Modi-Xi Jinping talks on tea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.