ब्रिटनमध्ये 24 वर्षातील सर्वात भीषण अपघात; आठ भारतीय जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 11:03 AM2017-08-28T11:03:26+5:302017-08-28T11:09:04+5:30
ब्रिटनमध्ये एका रस्ता अपघातात आठ भारतीयांचा जागीत मृत्यू झाला आहे.
लंडन, दि. 28- ब्रिटनमध्ये झालेल्या एका रस्ता अपघातात आठ भारतीयांचा जागीत मृत्यू झाला आहे. या आठ जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात गेल्या २४ वर्षातला ब्रिटनमधला सर्वात भीषण अपघात असल्याचं बोललं जात आहे. शनिवारी सकाळी बकिंगहॅमशायर मधील न्यूपोर्ट पॅगनेल इथे हा भीषण अपघात झाला. विप्रो कंपनीच्या आयटी प्रोफेशनल्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या एका मिनीबसची दोन लॉरींसोबत धडक झाली. यात विप्रोचे ३ कर्मचारी जागीच ठार झाले तर चौथा कर्मचारी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बसचालकही या अपघातात ठार झाला. सिरीअॅक जोसेफ तो बसचालकही भारतीय होता. दोन्ही लॉरीचालकांना घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे. या दोघांपैकी एकावर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारी त्यांना युके कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
'कार्तिकेयन रामसुब्रमण्यम पुगलर, ऋषी राजीव कुमार आणि विवेक भास्करन अशी मृत्यू झालेल्या आमच्या तीन कर्मचाऱ्यांची नावं आहेत,' असं विप्रोचे युकेचे ऑपरेशन्स हेड रमेश फिलीप्स यांनी सांगितलं. या भीषण अपघातात मनो रंजन पन्नीरसेल्वम या आमचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. तसंच या अपघातात दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आम्ही आवश्यक ती मदत करू, असंही फिलीप्स यांनी सांगितलं.
FedEX लॉरी आणि एका ट्रकला धडकल्यानंतर या १६ आसनी मिनीबसचा चुराडा झाला. अग्निशमन दलाच्या ९ गाड्या आणि 35 जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी अडकलेल्या चार जणांची सुटका केली. बसमध्ये चालकासह १२ भारतीय होते. हे सर्व केरळ आणि तामिळनाडूचे रहिवासी आहेत. या भीषण अपघातात ठार झालेले बसचे चालक सिरीअॅक जोसेफ ऊर्फ बेनी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. सिरीअॅक हे गेल्या 15 वर्षापासून युकेमध्ये राहत होते. ते मुळचे केरळचे असल्याची माहिती मिळते आहे.
ब्रिटनमध्ये शनिवारी झालेला हा अपघात 24 वर्षातील सगळ्यात भीषण अपघात असल्याचं बोललं जात आहे. याआधी नोव्हेंबर 1993 मध्ये ब्रिटनच्या महामार्गावर अपघात झाला होता. यामध्ये 12 मुलं आणि त्यांच्या शिक्षकांचा मृत्यू झाला होता.