सर्वात वाईट ‘आई’ची 20 वर्षांनी निर्दाेष सुटका; ४ मुलांच्या हत्येच्या आरोपात भाेगला कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 07:57 AM2023-12-15T07:57:37+5:302023-12-15T07:59:31+5:30
स्वतः च्याच ४ मुलांच्या हत्येच्या आरोपात तब्बल २० वर्षे तुरुंगवास भोगत असलेल्या एका ऑस्ट्रेलियन महिलेची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली.
न्यू साउथ वेल्स : स्वतः च्याच ४ मुलांच्या हत्येच्या आरोपात तब्बल २० वर्षे तुरुंगवास भोगत असलेल्या एका ऑस्ट्रेलियन महिलेची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली. कॅथलिन फोल्बिग असे या महिलेचे नाव असून ती दोन दशकांपासून निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी लढत होती.
कॅथलिनने १९८९ ते १९९९ दरम्यान, केलब, पॅट्रिक, सारा आणि लॉरा या चार मुलांची हत्या केल्याचे म्हटले जाते. हत्येवेळी मुलांचे वय १९ दिवसांपासून १८ महिन्यांपर्यंत होते. चारही मुलांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप तिच्यावर हाेता.
मी मुलांना मारलेच नाही....
आपल्या विरोधातील खटला खारीज झाल्यानंतर ५६ वर्षीय कॅथलिन म्हणाल्या की, मी माझ्या मुलांना मारलेच नाही.
मी वारंवार सांगूनही तपास यंत्रणा माझ्यावर विश्वास ठेवतच नव्हत्या. त्यांनी मला दोषी ठरविण्यातच धन्यता मानली.
परंतु नव्या तपासपद्धतीमुळे माझे निर्दोषत्व सिद्ध झाल्याचा मला आनंद आहे.
नुकसानभरपाईचे प्रयत्न
हत्याकांडानंतर ‘ऑस्ट्रेलियातील सर्वांत वाईट आई’ अशी तिची ओळख झाली होती. २००३ मध्ये न्यायालयाने तिला ४० वर्षांची शिक्षा सुनावली, पुढे ती घटवून ३० वर्षे करण्यात आली.
आपण निर्दोष असल्याचे सांगत ती गेली २० वर्षे लढत होती. अखेर न्यायालयाने तिच्यावर हत्येचा आरोप करणारे पुरावे विश्वासार्ह नसल्याचे सांगत खटला खारीज केला आणि तिची निर्दोष सुटका केली. तिचे वकील आता नुकसानभरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.