नवी दिल्ली - भारतीय बँकांना 9 हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या मद्यसम्राट विजय माल्याला भारतात परत आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत. मंगळवारी याच प्रकरणातील एका सुनावणीत लंडन कोर्टाकडून माल्याला दिलासा मिळाला आहे. याच दरम्यान विजय माल्याने ट्विट करुन पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. पैसे घ्या पण हे प्रकरण संपवा असं विजय माल्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे.
लंडन कोर्टाकडून विजय माल्याला दिलासा मिळाल्यानंतर विजय माल्याने हे ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये विजय माल्याने लिहिलं आहे की, माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत हे मी पहिल्यापासून सांगतोय. देव आहे त्यामुळे मला न्याय मिळणार. आता कोर्टानेही मला दिलासा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो. मी सगळे पैसे बँकांना परत देण्यास तयार आहे.
तसेच पैसे परत घ्या, सर्व अकाऊंट क्लीअर करा, मी सर्व कर्मचाऱ्यांनाही पैसे देऊ इच्छितो. सर्व गुंतवणुकदारांचे आणि कर्मचाऱ्यांचे पैसे देऊन मला जीवनात पुढे जायचं आहे असं विजय माल्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे.
प्रत्यार्पण खटल्याविरोधात अपील करण्याबाबत विजय माल्याने लंडन कोर्टात परवानगी मागितली होती. या प्रकरणात लंडनच्या कोर्टात मंगळवारी माल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणात सुनावणी झाली. अपील करण्यासंदर्भात लंडन कोर्टाने त्याला परवानगी दिली. त्यामुळे विजय माल्याला भारतात आणण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहायला आलेल्या विजय माल्याला भारतीय क्रिकेट चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरलं होतं. विजय माल्ल्याला पाहताच चाहत्यांनी 'चोर है!' चा नारा दिला होता. दरम्यान, विजय माल्याने जेट एअरवेज प्रकरणावेळीही सरकारी बँकांना ऑफर दिली होती. सरकारी बँकांनी माझ्याकडे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर माल्याने दिली होती. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कर्जदात्यांकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची मदत मिळावी म्हणून नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनीता गोयल यांनी पद सोडले होते.