नवी दिल्ली - म्यानमारविमानतळावर विमानाचा मोठा अपघात होण्यापासून वाचला. विमानाचा लँडिंग गिअर फेल झाल्याने इमर्जन्सीमध्ये दोन चाकांवर विमान रनवेवर उतरविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमानातील 89 प्रवाशांचे जीव वाचले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे.
रविवारी यूबी 103 या विमानाचे म्यानमार येथील मंडाले एअरपोर्टवर सकाळी 9 च्या सुमारात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात 7 कर्मचाऱ्यांसह एकूण 89 प्रवाशी प्रवास करत होते. या विमानाचा खतरनाक लँडिंग सध्या सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. काही तांत्रिक कारणामुळे विमानातील लँडिंग गिअर बॉक्स खराब झाला. म्यानमारचे सिव्हील एव्हिएशन विभागाचे डिप्टी डायरेक्टर जनरल यांनी सांगितले की, विमानातील पायलटने लँडिंगवेळी विमानातील लँडिंग गिअर सुरु करण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र त्यात यश आलं नाही.
पहिल्यांदा त्याने कॉम्प्युटर सिस्टमने गिअर बॉक्स उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उघडला नाही म्हणून हाताने गिअर उघडण्याचा प्रयत्न केला त्यातही त्याला यश आलं नाही. त्यामुळे विमानाचे पुढचे चाक उघडले नाही. त्यानंतर मागच्या दोन चाकांवरच ही लँडिंग करण्यात आली. एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पायलटच्या चाणाक्ष्य बुद्धीने आणि हिंमतीने अशाप्रकारे लँडिंग केलं गेलं अन्यथा असं लँडिंग करणे खूप धोकादायक असते यामध्ये प्रवाशांचा जीवही गेला असता.
या विमानाची चौकशी करण्यासाठी म्यानमार येथे इंजिनिअर पाठवण्यात आला आहे. सर्व विमानांची तपासणी रोजच्या रोज केली जाते. तसेच उड्डाणाच्या अगोदरही विमानाची तपासणी केली जाते. चार दिवसांपूर्वी बुधवारी बांग्लादेश एअरपोर्ट येथेही यांगून येथे खराब वातावरणामुळे विमानाचं क्रैश लँडिंग करण्यात आलं. त्यावेळी 11 प्रवाशी जखमी झाले होते. म्यानमार येथे पावसाळी हवामानात विमानसेवेवर खूप मोठा परिणाम होतो. 2017 मध्ये सैन्याचे विमान समुद्रात क्रैश झाले होते. त्यात 122 प्रवाशी होते. ही दुर्घटना खराब वातावरणामुळे झाली होती. देशाच्या इतिहासात आत्तापर्यत सर्वांत मोठा विमान अपघात होता.