मोहेंजोदरोमधील उत्खननात सापडला रहस्यमय खजिना, अनेक रहस्यांचा होणार उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 06:08 PM2023-11-18T18:08:06+5:302023-11-18T18:09:28+5:30
Mohenjodaro: सिंधू संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचं शहर होतं मोहेंजोदरो. हे शहर आता पाकिस्तानमध्ये आहे. आता हल्लीच या क्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या खोदकामामध्ये पाकिस्तानी कामगारांना काही तांब्याची नाणी सापडली आहेत.
सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती ही नियोजनबद्ध शहरं असलेली जगातील सर्वात प्राचीन संस्कृती मानली जाते. या संस्कृतीचा विस्तार भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपर्यंत झालेला होता. या संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचं शहर होतं मोहेंजोदरो. हे शहर आता पाकिस्तानमध्ये आहे. आता हल्लीच या क्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या खोदकामामध्ये पाकिस्तानी कामगारांना काही तांब्याची नाणी सापडली आहेत. या नाण्यांच्या अभ्यासामधून या संस्कृतीबाबतच्या काही रहस्यांवरून पडदा हटेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
संरक्षण विभागाचे संचालक सय्यद शाकिर शाह यांनी सांगितले की, मोहेंजोदारोच्या एका साईटजवळील भिंत कोसळली होती. कामगार तिचं खोदकाम करत होते. त्यादरम्यान त्यांना तांब्याच्या नाण्यांनी भरलेलं एक भांडं मिळालं. तपास पथकांनी ते संशोधनासाठी लॅबमध्ये पाठवले आहे.
शाह यांनी प्रसारमाध्मयांना संबोधित करताना सांगितले की, या नाण्यांवर कुठल्यातरी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेले आहे. ही नाणी जमिनीतून बाहेर काढणे आव्हानात्मक होते. बराच काळ जमिनीमध्ये दबून राहिल्यामुळे नाण्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. या नाण्यांवर अन्य भाषेमध्ये काहीतरी लिहिले आहे. त्यावर काय लिहिलं आहे आणि ही नाणी कुठल्या काळातील आहेत, हे त्यांच्या तपासणीतून समोर येईल. या नाण्यांमुळे या संस्कृतीच्या रहस्यांवरून पडदा उलगडणार आहे.
मोहेंजोदरो आणि हडप्पा ही सिंधू संस्कृतीमधील सर्वात उन्नत आणि विकसित शहरं होती. येथील उत्खननामध्ये पक्के रस्ते, स्नानगृह, नियोजनबद्ध बांधकाम समोर आले होते. तसेच तेव्हाची भांडी, नर्तकीची एक मूर्ती आणि इतर वस्तूही सापडल्या होत्या. १९८० मध्ये मोहेंजोदरोला यूनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान दिले होते.