ऑस्ट्रेलिया : आपल्याला एखादा असाध्य रोग झाला आहे असं जेव्हा कोणाला कळतं तेव्हा प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते. आजारातून बाहेर पडण्यापेक्षा काहीजण आयुष्याला दोष देत रडत बसतात. पण काहीजण यातूनही हटके विचार करतात आणि आपल्या आजाराला दूर पळवतात. आपल्याला असलेल्या दुखण्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करायला हव्यात, असा काहीसा संदेश ऑस्ट्रेलियातील एका मेकअप आर्टिस्टच्या कृतीतून आपल्याला मिळतो. सध्या ती इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर चांगलीच गाजते आहे. पण तिच्या या यशामागे तिची मेहनत आहे, हेही विसरून चालणार नाही.
ऑस्ट्रेलियाची मेकअप आर्टिस्ट जझ्मिना डेनिएट सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड प्रसिद्ध होतेय. तिने लिप आर्टमध्ये केलेली कामगिरी महिलांना भूरळ घालतेय. पण जझ्मिनाची जीवन कहाणीही तितकीच हेलवणारी आहे. पण तिच्या आजारामुळेच तिने तिच्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला असंही म्हणायला हरकत नाही. २५ वर्षीय जझ्मिना हिला ब्रेन ट्युमर आहे.
जझ्मिना याबाबतीत म्हणते की, ‘मला ट्युमर असल्याचं समजलं तेव्हा मी माझा बराच वेळ घरातच घालवायचे. या काळात मी माझा आनंद शोधत असायचे. ज्या गोष्टींनी मला आनंद मिळेल ते काम करायचे. मला चित्र काढायला खूप आवडतात. त्यामुळे मी कॅनव्हॉसवर चित्र रेखाटत बसायचे. त्यानंतर मी चेहऱ्यावर चित्र रेखाटायला सुरुवात केली. आजारी असतानाच मी काही मेकअप कोर्सेसही केले. त्यानंतर मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करू लागले.’ आता जझ्मिना चेहऱ्यावर, ओठांवर रेखीव चित्र रेखाटत असते. कॅनव्हॉसवरील चित्रकला ती आता चेहऱ्यावर रेखाटत असल्याने नेटीझन्सनेही तिच्या या कलेवर भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केलीय.
शिक्षण आणि अनुभव मिळाल्याने जझ्मिना आणखी क्रिएटिव्ह बनत गेली. हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटातून तिने प्रेरणा घेत तिने चित्रपटातील प्रसिद्ध दृष्य आपल्या चेहऱ्यावर रेखाटायला सुरुवात केली. तिने तिची ही कलाकृती इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर शेअर केलीये. त्यानंतर तिला हजारो लोकांनी फॉलो करायला सुरुवात केली.
या सुंदर चेहऱ्यावरील चित्रकलेविषयी तिला विचारलं असता ती म्हणाली की, ‘प्रत्येक आर्टिस्ट एकाच प्रकारचा विचार करतो. जोपर्यंत आपण केलेलं काम समाधान देत नाही तोवर काम करत राहायचं. आपण केलेल्या कामातून आपल्याला आनंद मिळाला तरच मजा येते.’
आणखी वाचा : नेलआर्टचा छंद असणाऱ्या मुलींनो कधी बबल नेल ट्राय केलं आहे का?
ती पुढे म्हणते की, ‘माझ्यासाठी मी तयार केलेली सगळीच डिझाइन्स खास आहे, त्यापैकी कोणतंही एक असं माझं खास नाहीए. ही प्रत्येक कलाकृती माझ्या प्रेमाचं प्रतिनिधित्व करत असते. यातूनच मला आनंद मिळत असतो.’ ब्रेन ट्युमरसारखा आजार असूनही जझ्मिना आपली कला जोपासत आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर जाऊन तुम्ही तिच्या काही कलाकृती पाहू शकता. इन्स्टाग्रामवर तिला १ मिलिअन पेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. तसचं, मेकअप ट्युटोरिअल्ससाठी तिच्या युट्यूबवर अनेक सबस्क्रायबर्स आहेत.
आणखी वाचा - हा युट्यूबर महिन्याला कमावतो लाखो रुपये, वाचा काय आहे त्याचा हटके छंद