नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर सर्वाधिक पसंती मिळालीय. सोशल मीडिया ब्रँड ट्विप्लोमसीनं जगात सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या नेत्यांबद्दल सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये मोदींना जगभरातून सर्वाधिक पसंती मिळालीय. मोदीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक लागतो. जगभरात कोणत्या नेत्याला सर्वाधिक पसंती दिली जाते, यासाठी ट्विप्लोमसीनं सर्वेक्षण केलं होतं. यासाठी फेसबुकवरील 650 पेजेसचा विचार करण्यात आला. या पेजवरील माहिती, फोटोज, व्हिडीओज यांचा अभ्यास करून, त्याला लोकांना मिळणारा प्रतिसाद पाहून अहवाल तयार करण्यात आला. ओदिशातील लिंगाराज मंदिर यात्रेदरम्यानच्या मोदींच्या फोटोला सर्वाधिक लाईक्स मिळालेत. याशिवाय मोदींच्या इस्रायल दौऱ्यादरम्यानचा व्हिडीओ सर्वाधिक पसंती मिळवणारा इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा व्हिडीओ ठरलाय. पंतप्रधान मोदींना 43.2 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. जगभरात फेसबुकवर अव्वल ठरलेल्या मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ्या फरकानं मागे टाकलंय. डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुकवर 23.1 मिलियन लाईक्स मिळालेत. यानंतर या क्रमवारीत जॉर्डनची राणी रॅनिया, तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्डोगान, इंडोनेशियाचे अध्यक्ष विदोदो, इजिप्तचे अध्यक्ष सिसी आणि कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांचा क्रमांक लागतो.
मोदी फेसबुकवर नंबर वन; संपूर्ण जगात सर्वाधिक पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 9:38 AM