एलियन्सचा धोका; जगाला वाचवण्यासाठी 'नासा'मध्ये व्हॅकेन्सी, पगारही रग्गड
By sagar.sirsat | Published: August 3, 2017 05:57 AM2017-08-03T05:57:46+5:302017-08-04T11:09:39+5:30
पृथ्वीला एलियन्सपासून धोका असल्याचं केवळ सिनेमा किंवा गोष्टींपर्यंत सीमित राहिलेलं नसल्याचं स्पष्ट. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने एलियन्सचा संभाव्य धोका ओळखला,पृथ्वीचं रक्षण करता यावं यासाठी काही शूर अधिका-यांची नासाला गरज.
वॉशिंग्टन, दि. 3 - ''ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत का? हे आम्हालाही अजून नक्की माहिती नाही... पण या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आमचे अनेक मिशन सुरू आहेत'' असं उत्तर एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नासाकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आलं होतं. पण नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार पृथ्वीला एलियन्सपासून धोका असल्याचं केवळ सिनेमा किंवा गोष्टींपर्यंत सीमित राहिलेलं नसल्याचं जवळपास स्पष्ट होत आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने एलियन्सचा संभाव्य धोका ओळखला आहे. एलियन्सच्या हल्ल्यापासून पृथ्वीचं रक्षण करता यावं यासाठी काही शूर अधिका-यांची नासाला गरज आहे. यासाठी नासाने अशाच शूर अधिका-यांची भरती करण्याचं ठरवलं आहे. या कामासाठी नासाकडून रग्गड पगारही दिला जाणार आहे.
वॉशिंग्टन पोस्ट आणि इन्डिपेंडंट(independent.co.uk)यासारख्या इंग्रजी वेसबाइटच्या वृत्तानुसार या कामासाठी नासा 1 लाख 24 हजार 406 डॉलर ते 1 लाख 87 हजार डॉलर पगार वर्षाला देण्यास तयार आहे. अमेरिकी सरकारच्या एका अधिकृत वेबसाइटवर या भरती प्रक्रियेबाबत माहितीही देण्यात आली आहे. प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसर (PPO) म्हणजेच ग्रह संरक्षण अधिकारी या पदासाठी ही भरती आहे. पहिल्या तीन वर्षाच्या कराराच्या आधारावर या नोकरीची ऑफर आहे.
हे असणार प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरचं काम-
प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरचं काम आव्हानात्मक असेल. त्याला एलियन्समुळे पृथ्वीला असलेल्या संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन त्याबाबत नासाला माहिती पुरवावी लागेल. मानवामुळे किंवा अन्य कोणामुळे अवकाशातील महत्वाच्या घटकांना धोका पोहोचणार नाही याशिवाय पृथ्वीच्या कक्षेत एलियन्स प्रवेश करणार नाहीत याची खबरदारी घेणं, तसंच अवकाशातील नासाच्या उपग्रहांची रक्षा करणं, नासाच्या फ्लाइट मिशनला कार्यान्वित करणं आणि पृथ्वीबाहेरील जैविक प्रदूषण रोखणं ही प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरची मुख्य कामं असणार आहेत.
प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसर पदासाठी काय आहे पात्रता-
या अधिका-याला अभियांत्रिकी क्षेत्रात उच्चस्तरीय ट्रेनिंग आणि अनुभव असणं गरजेचं आहे. याशिवाय प्लॅनेट्री प्रोटेक्शनमध्ये तो तज्ञ असायला हवा. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी. अवघड परिस्थितीत अंदाज घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी.