'नासा'च्या कॅलेंडरमध्ये महाराष्ट्राच्या मुलांना मानाचं पान; कव्हर पेजवर भारतीय सुकन्येला स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 12:14 PM2018-12-24T12:14:46+5:302018-12-24T12:19:17+5:30
महाराष्ट्रातील दोन मुलांनी रेखाटलेलं चित्र नासाच्या कॅलेंडरमध्ये
वॉशिंग्टन: नासाच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये भारतीय मुलांनी मानाचं स्थान पटकावलं आहे. कमर्शियल क्रू कार्यक्रमाच्या अंतर्गत नासानं नववर्षासाठी कॅलेंडर लाँच केलं आहे. यातील सर्व चित्रं लहान मुलांनी रेखाटली आहेत. विशेष म्हणजे या कॅलेंडरच्या कव्हर पेजवर भारतीय कन्येनं रेखाटलेल्या चित्राला जागा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दोघांनी काढलेल्या चित्राचादेखील या कॅलेंडरमध्ये समावेश आहे.
नासाचं यंदाचं कॅलेंडर अवकाशातील जीवन या विषयाला वाहिलेलं आहे. या कॅलेंडरचं कव्हर पेजवरील चित्र उत्तर प्रदेशातील नऊ वर्षांच्या दीपशिखानं रेखाटलं आहे. याशिवाय या कॅलेंडरमध्ये आणखी तीन भारतीय विद्यार्थ्यांची चित्रं आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यातील दोघेजण महाराष्ट्राचे आहेत. राज्यातील 10 वर्षांच्या इंद्रयुद्ध आणि 8 वर्षांच्या श्रीहन यांनी एकत्रितपणे तयार केलेलं चित्र या कॅलेंडरमध्ये आहे. अंतराळातील जीवन आणि तिथं चालणारं काम या विषय केंद्रस्थानी ठेऊन दोघांनी चित्र रेखाटलं आहे.
तमिळनाडूत राहणाऱ्या 12 वर्षांच्या थेमुकिलिमनच्या कलाकृतीलादेखील कॅलेंडमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यानं रेखाटलेलं चित्र अंतराळातील खाद्य यावर आधारित आहे. कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आलेली चित्रं अंतराळ विज्ञानाशी नातं सांगणारी आहेत, असं नासानं प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे. अंतराळस्थानकात वास्तव्यात असणाऱ्या अंतराळवीरांचं आयुष्य, त्यांचं काम मुलांपर्यंत पोहोचावं, या उद्देशानं कॅलेंडरची निर्मिती करण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे.