NASA ने शेअर केला एका मोठ्या बुडबुड्यात अडकलेल्या ताऱ्याचा फोटो, पाहून तुम्हीही व्हाल चकीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 12:26 PM2021-07-20T12:26:48+5:302021-07-20T12:33:13+5:30
NASA shares photo of star: नासाद्वारे 1990 मध्ये तयार केलेल्या हबल स्पेस टेलीस्कोपनं हा फोटो टिपला आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा(NASA)आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन नेहमीच अंतराळातील विविध फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करत असतात. असाच एक फोटो नासानं शेअर केला आहे. 2016 मध्ये काढलेला हा फोटो चकीत करणारा आहे. या फोटोमधून नासानं अंतराळातील एका मोठ्या बुडबुड्यात अडकलेला तारा दाखवला आहे.
नासानं 1990 मध्ये हबल स्पेस टेलीस्कोप (Hubble Space Telescope) ची निर्मिती केली होती. 1990 मध्ये लॉन्च झाल्यापासून या टेलीस्कोपनं अनेक सुंदर छायाचित्रे काढली. पण, मागच्या काही काळापासून काँप्यूटर खराब झाल्यामुळे हे टेलीस्कोप बंद होते. पण, आता टेलीस्कोप पुन्हा सुरू झाला आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी नासा (NASA) नं इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका मोठ्या बुडबुड्यात तारा अडकलेला दिसत आहे. हा फोटो पाहून लोकंही चकीत झाले आहेत.
हा फोटो शेअर करत नासाने लिहीलं,"काँप्यूटर खराब झाल्यामुळे हबलने काही दिवसांपासून फोटो घेणं बंद केलं होतं. पण, आता ही खराबी दुर करण्यात आली आहे. आता हा टेलीस्पोट पूर्वीप्रमाणे काम करण्यास तयार आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही हबलने घेतलेला एक फोटो शेअर करत आहोत.”
या पोस्टमध्ये नासाने बुडबुड्यात अडकलेल्या ताऱ्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहीलं की, "या बबल नेबुलाच्या आत आपल्या सुर्यापेक्षा एक लाख पट अधिक चमकणारा तारा आहे. या ताऱ्याची गती चार मिलीयन मैल प्रती तासांपेक्षा अधिक आहे.”