नासाच्या ‘स्पेस-एक्स’चा अवकाशात झाला स्फोट
By admin | Published: June 28, 2015 11:42 PM2015-06-28T23:42:24+5:302015-06-28T23:42:24+5:30
अन्नपदार्थासह विविध संगणकीय व विज्ञान साहित्याची कूमक घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे झेपावलेल्या ‘स्पेस-एक्स-फाल्कन-९’ रॉकेटचे रविवारी तुकडे-तुकडे झाले.
केप कॅनाव्हेरल : अन्नपदार्थासह विविध संगणकीय व विज्ञान साहित्याची कूमक घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे झेपावलेल्या ‘स्पेस-एक्स-फाल्कन-९’ रॉकेटचे रविवारी तुकडे-तुकडे झाले. यामुळे ‘नासा’ची ही कुमक मोहीम अपयशी ठरली. २, ४७७ किलो वजनी विविध साहित्य घेऊन निघालेले यान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर पाठविण्यासाठी ही पाच दिवसांची मोहीम नासाने हाती घेतली होती. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.२२ वाजता हे रॉकेट झेपावल्याची खबर नासाने टिष्ट्वटने दिली होती. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनी या रॉकेटचा स्फोट झााल्याचे नासाने टिष्ट्वट करुन कळविले.
या मालवाहक यानाला जोडलेले रॉकेट पहिल्या टप्प्यात अलग होण्याच्या बेतात असताना ही दुर्घटना घडली. स्पेस-एक्स यानाचा फाल्कन-९ रॉकेटशी असलेला संपर्क उड्डाणानंतर २ मिनिट व १९ व्या सेंकदाला तुटला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, हे स्पष्ट झाले नाही, असे नासाचे समालोकच जॉर्ज डिलेर यांनी सांगितले. नेमक कुठे चूक झाली, हे तपासण्यासाठी व्हिडियो फितीचे बारकाई निरीक्षण केले जात आहे.
फाल्कन-९ हे रॉकेट २०८ फूट लांबीचे असून या रॉकेटची १९ वी झेप होती. स्पेस-एक्स ही कंपनी ईलॉन मस्क यांची असून अंतराळ क्षेत्रात उतरल्यानंतर या कंपनीच्या वाट्याला आलेली ही पहिलीच दुर्घटना होय.