इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलोचिस्तानातील जनतेवर पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा उल्लेख केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या बलोची नेत्यांवर पाकिस्तानात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बलोची जनतेचा मोदी यांच्या विधानांना पाठिंबा असल्याचे वक्तव्य या बलोची नेत्यांनी केले होते.गेली अनेक वर्षे बलोचिस्तानात पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या जनतेवर पाकिस्तान सरकार आणि पोलीस सातत्याने अन्याय आणि अत्याचार करीत आहेत. काश्मिरात पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीची भारताची तक्रार जुनी आहे. त्यातच अलीकडील काळात काश्मीर खोऱ्यात जो हिंसाचार सुरू आहे, त्यातही पाकचा हात असल्याचे भारताने म्हटले आहे. मात्र काश्मीर प्रश्नावर भारताने आपल्याशी चर्चा करावी, असे पाकिस्तानचे म्हणणे असून, ते फेटाळून लावत, भारताने बलोचिस्तानातील अत्याचारांचा उल्लेख केला होता.या साऱ्या प्रकारामुळे पाकिस्तान पोलिसांनी ब्रह्मदाग बुगती, करिमा बलोच, हरबियार मार्री यांच्याविरुद्ध देशद्रोह, देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करण्याचे गुन्हे नोंदविले आहेत. शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळे आणण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांविरुद्ध काही बलोची नागरिकांनी पाच पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. त्याआधारे पाचही पोलीस ठाण्यांमध्ये या नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. या गुन्ह्यांसाठी पाकिस्तानात मोठ्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र या नेत्यांवर कारवाई झाल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया बलोचिस्तानात उमटू शकेल. (वृत्तसंस्था) >पंतप्रधान मोदी यांना केले होते आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात गिलगिट आणि बलोचिस्तानमधील अत्याचारांचा उल्लेख केल्यामुळे पाकिस्तानचा संतापच झाला. भारत आमच्या देशात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोपही पाकतर्फे करण्यात आला. मात्र बलोचिस्तानी जनतेला आपली बाजू मोदी मांडत असल्याचा आनंद झाला. तेथील अनेक नेत्यांनी मोदी यांच्या विधानाचे स्वागत व अभिनंदन केले. तेथील एक सेलिब्रिटी करिमा बलोच यांनी तर उघडपणे मोदी यांचे अभिनंदन करताना भारतीय पंतप्रधानांनी बलोची जनतेचा आवाज बनावे, असे आवाहन केले होते.>बलोच व गिलगिट आंदोलकांना दडपण्यास सरकार जे मार्ग अवलंबत आहे, त्यामुळे आंदोलनाला जोर चढत असल्याचे सांगण्यात येते.
बलोच नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे
By admin | Published: August 23, 2016 5:11 AM