संयुक्त राष्ट्र : युद्ध, हिंसाचार, छळ आणि अन्य संकटांमुळे जगभरात २०१९ अखेर ८ कोटी लोकांना विस्थापित व्हावे लागले, असे संयुक्त राष्ट्राच्या निर्वासित संस्थेने म्हटले आहे.एकट्या २०१९ मध्ये १.१ कोटी लोक नव्याने विस्थापित झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांसाठींच्या उच्चायुक्तांनी जागतिक निर्वासित दिनाच्या आधी गुरुवारी जारी केलेल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. गेल्या एक दशकातील एकूण संख्येच्या ही संख्या दुप्पट आहे.२.४ दशलक्ष लोकांनी अन्य देशांत आश्रय मागितला, तर ८.६ दशलक्ष लोक आपल्याच देशात विस्थापित झाले. अनेक विस्थापितांना नव्याने जीवन सुरू करता आले नाही. केवळ ३,१७,२०० निर्वासितांना आपल्या मूळ देशांत परतता आले, तर १०,७,८०० लोकांना अन्य देशांत बस्तान मांडता आले, असे या अहवालात म्हटले आहे.विस्थापितांचा मुद्दा सर्व देशांशी संबंधित आहे. आकडेवारीनुसार गरीब देशांतील ८५ टक्के लोकांना राहती घरे सोडावी लागली. हा जागतिक मुद्दा असला तरी गरीब देशांसाठी सर्वाधिक आव्हानात्मक आहे.कोरोनामुळे मोठ्या संख्येने स्थलांतर होत असल्याने लोक संकटात आहेत, यात शंका नाही, असे फिलिप्पो ग्रॅण्डी यांनी जिनेव्हामध्ये पत्रकारांशी बोलताना नमूद केले. युद्ध, हिंसाचार, अत्याचार आदी कारणांमुळे निर्वासित झालेल्या ८ कोटी लोकांचे रक्षण करणे, ही सर्व देशांची मूलभूत जबाबदारी आहे, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅन्टोनियो गुटेरेस यांनी जागतिक निर्वासित दिनानिमित्त संदेश देताना सांगितले. निर्वासितांना आसरा देणाऱ्या देशांचीही त्यांनी प्रशंसा केली.जगभरात २०१९ पर्यंत ८ कोटी किंवा शंभर लोकांपैकी एक जण विस्थापित झाला. जगभरात विस्थापित होणाऱ्या लोकांची ही संख्या एका दशकातील दुप्पट आहे. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या एक टक्का आहे, असे संयुक्त राष्ट्र निर्वासित आयुक्त फिलिप्पो ग्रॅण्डी यांनी म्हटले आहे.
युद्ध, हिंसाचारामुळे जगभरात आठ कोटी लोक विस्थापित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 4:45 AM