लंडन : युरोपमध्ये कोरोनाची नवी लाट आली असून, ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे २६ हजार नवे रुग्ण सापडले. गेल्या २९ जानेवारीपासून आतापर्यंत त्या देशात आढळलेल्या नव्या रुग्णांचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.
रुग्णांची संख्या वाढत असली तरी ब्रिटनमधील दररोजच्या मृत्यूचा आकडा १०० पेक्षा कमी आहे. जानेवारी महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोना साथीने भीषण स्वरूप धारण केले होते. त्यावेळी दररोज हजार लोक कोरोनाचे बळी ठरत होते. ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण मोहीम वेगाने राबविली गेली. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. तिथे प्रौढ व्यक्तींपैकी ८४.९ टक्के लोकांना कोरोना लसीचा एक डोस तर ६२.४ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
युरोपमध्ये कोरोना साथीची नवी लाट येण्याची जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलेली भीती खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील दहा आठवडे युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होती, पण आता त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेमध्ये युरोपातील अनेक देशात भीषण स्थिती होती. तेथील अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. नव्या लाटेतही पुन्हा त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होणार का, अशी भीती युरोपीय नागरिकांच्या मनात आहे.
भारतात कोरोना बळींची संख्या गेली ४ लाखांच्या घरात
नवी दिल्ली : देशातील कोरोना बळींची संख्या ४ लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या २४ तासांत या आजाराचे ४८ हजार नवे रुग्ण सापडले व ६१ हजार जण बरे झाले तर १,००५ जण मरण पावले. ९६ टक्के कोरोनामुक्त झाले आहेत.
स्पुतनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यांतील चाचण्यांनाही केंद्राचा नकार
nरशियन बनावटीच्या स्पुतनिक लाइट या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा पार पाडण्यास डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीला केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने परवानगी नाकारली आहे. ही लस एका डोसची आहे.
nदेशातील लसीकरणात स्पुतनिक व्ही लस वापरण्यात येते. तिची स्पुतनिक लाइट ही वेगळी आवृत्ती आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)ने स्पुतनिक व्ही व स्पुतनिक लाइट या दोन्ही लसी विकसित केल्या आहेत. या लसींच्या भारतातील चाचण्या व उत्पादनाची जबाबदारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडे आहे. तसा या दोन कंपन्यांमध्ये करार झाला आहे. कोरोना लसीकरणाची मोहीम वेगवान होण्याकरिता एका डोसची लस विकसित करण्याकडे केंद्र सरकारचा काही महिन्यांपूर्वी कल होता.
nस्पुतनिक लाइट या लसीच्या मानवी चाचण्यांसाठी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजने जून महिन्यात केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. या लसीच्या आपत्कालीन वापराला जर मंजुरी दिली असती तर ती अशा प्रकारची भारतातील एका डोसची पहिली कोरोना लस ठरली असती. स्पुतनिक लाइट ७९.४ टक्के परिणामकारक आहे. विषाणूच्या सर्व प्रकारांवर ती प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला होता.