नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार भारत
By जयदीप दाभोळकर | Published: January 1, 2021 11:56 AM2021-01-01T11:56:24+5:302021-01-01T11:57:38+5:30
UNSC : भारत आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यरत असणार आहे. यूएनएससीमध्ये पाच स्थायी सदस्य आणि १० अस्थायी सदस्य असतात.
आजपासून नववर्षाला सुरूवात झाली आहे आणि हे नववर्ष भारतासाठीही अनेक बाबतींत महत्त्वाचं असणार आहे. आज म्हणजेच १ जानेवारीपासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्याच्या रुपात सहभागी होणार आहे. १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कार्यकाळात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठीही सज्ज आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत यांनी या कार्यकाळात भारताची भूमिका काय असेल याबाबत माहिती दिली. भारत मानवाधिका आणि विकासासारख्या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यूएनएससीमध्ये पाच स्थायी सदस्य आणि १० अस्थायी सदस्य असतात. आठव्यांदा भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
"जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत हा मानवाधिकार आणि विकासासारख्या मुद्द्यांवर या परिषदेत भर देणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अनेक मार्गांनी प्रतिबिंबित झालेल्या एकीकृत चौकटीत आपण विविधता कशी वाढवू शकतो, असा संदेशही भारत देणार आहे," अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्ती म्हणाले.
"या बैठकीत भारत व्यापक सहकार्याची गरजही पटवून देणार आहे. आम्ही यापूर्वी मिळत होतं त्यापेक्षा अधिक सहकार्याची अपेक्षा करत आहोत. ज्यामध्ये कोणत्याही समस्यांचं निराकरण केलं जाऊ शकेल आणि विकासाचा मार्गही मोठा असेल," असं त्रिमूर्ती म्हणाले.
पाकिस्तानला चिंता
भारताच्या आजपासून अस्थायी सदस्य म्हणून सुरू होणाऱ्या कार्यकाळामुळे पाकिस्तानची चिंता वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे. भारतानं अनेकदा दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानची चिंता यावेळीही वाढणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी सदस्य त्रिमूर्ती यांनीदेखील याचे संकेत दिले आहेत. सदस्याच्या रूपात भारताच्या कार्यकाळात दशतवादाला विरोध, शांततेचं संरक्षण, समुद्री सुरक्षा, तंत्रज्ञान, महिला आणि तरुणांचा विकास यांसारख्या विषयांना भारत प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.
कोणते देश होणार सहभागी?
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत, नॉर्वे, केनया, आयर्लंड आणि मॅक्सिको हे २०२१ या वर्षात अस्थायी सदस्याच्या रूपात सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त एस्टोनिया, नायझर, सेंट विन्सेंट, ट्युनिशिया आणि व्हिएतनाम हेदेखील अस्थायी सदस्य आहेत. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत.