Coronavirus: अमेरिकेत 900हून जास्त मृत्युमुखी; टेंट अन् ट्रकांमध्ये शवागार बनवण्याची तयारी, पडू शकतो मृतदेहांचा खच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 09:27 AM2020-03-26T09:27:52+5:302020-03-26T19:08:11+5:30
अमेरिकेत येत्या काही दिवसांत कोरोनामुळे शेकडोंच्या संख्येनं मृत्यू होऊ शकतात. अशातच कोरोना व्हायरसनं मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह वेगळे ठेवण्याचीही तयारी सुरू झाली आहे.
न्यूयॉर्कः कोरोना व्हायरसच्या प्रकोपानं अमेरिकेतही खळबळ उडालेली आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस शेकडोंच्या संख्येनं संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. न्यूयॉर्कची परिस्थिती तर अत्यंत बिकट असून, ३० हजारांहून जास्त रुग्ण तिथे आढळून आले आहेत. प्रत्येक दिवशी रुग्णांची संख्या दुप्पटच होत चालली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत येत्या काही दिवसांत कोरोनामुळे शेकडोंच्या संख्येनं मृत्यू होऊ शकतात. अशातच कोरोना व्हायरसनं मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह वेगळे ठेवण्याचीही तयारी सुरू झाली आहे.
टेंट आणि ट्रकांमध्ये शवागार
सीएनएनच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कच्या अनेक रुग्णालयात कर्मचारी टेंट आणि रेफ्रिजरेटेडे ट्रकमध्ये शवागार तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. अमेरिकेतली परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचंही तिथल्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. न्यूयॉर्कमध्ये आधीच आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ट्रकांमध्ये अशा प्रकारचे तात्पुरते शवागार ९/11च्या हल्ल्यानंतरही तयार करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा मृतदेहांना वेगळे ठेवण्यात येते, जेणेकरून हा संसर्ग आणखी पसरू नये, भारतात अशा मृत्यूनंतर मृतदेहांचे पोस्टमार्टम केले जात नाही. भारतात अशा मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतल्या बर्याच शहरांमध्ये परिस्थिती भयंकर
अमेरिकन अधिका-यांच्या म्हणण्यानुसार न्यूयॉर्क व्यतिरिक्त उत्तर कॅरोलिनामध्ये टेंट आणि रेफ्रिजरेटेड ट्रक तयार केले जात आहेत. आतापर्यंत अमेरिकेत 900 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. तसेच येत्या काही दिवसांमध्ये न्यूयॉर्कमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता देखील असू शकते. अमेरिकेत, 20 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत आणि यापैकी 80 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते.
न्यूयॉर्कमध्ये होईल का वुहानसारखी परिस्थिती?
जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, अमेरिका संपूर्ण जगासाठी कोरोना विषाणूचे नवीन केंद्र बनले आहे. चीनच्या वुहाननंतर या शहरात सर्वाधिक मृत्यू होऊ शकतात. न्यूयॉर्कची लोकसंख्या सुमारे 8 दशलक्ष आहे. अलीकडेच येथे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 150पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 65 हजार लोक कोरोना विषाणूनं संक्रमित झाले आहेत.