न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून चिनी कंपन्यांना बाहेरचा रस्ता; चीननं दिला इशारा
By जयदीप दाभोळकर | Published: January 3, 2021 01:55 PM2021-01-03T13:55:01+5:302021-01-03T13:57:09+5:30
चीनच्या तीन मोठ्या कंपन्यांना न्यूयॉर्क स्टॉर एक्सचेंजमधून हटवण्याची करण्यात आली होती घोषणा
अमेरिकेनं चीनच्या तीन मोठ्या दूरसंचार कंपन्यांना न्यूयॉर्क स्टॉर एक्सचेंजमधून हटवण्याची घोषणा केली. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देत चीननं प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. यामुळे चीन आणि अमेरिकेदरम्यान तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चायना टेलिकॉम कॉर्पोरेशन लिमिटेड, चायना मोबाईल लिमिटेड आणि चायना युनिकॉम हाँगकाँग लिमिटेड या कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजमधून डिलिस्ट करण्यात येणार असल्याची घोषणा न्यूयॉर्क स्टॉक एक्सजेंचनं गुरूवारी केली होती. या कंपन्यांचे शेअर्स ७ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान कोणत्याही क्षणी बंद करण्यात येतील, असंही यावेळी सांगण्यात आलं होतं.
ज्या कंपन्यांची मालकी चीनच्या सैन्याकडे आहे असा अमेरिकेचा दावा असणाऱ्या कंपन्या ज्या सार्वजनिकरित्या कार्यरत आहेत, अशा कंपन्यांच्या गुंतवणुकीवर निर्बंध लादण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ नोव्हेंबर रोजी सरकारी आदेशाद्वारे ही माहिती दिली होती. यानंतरही चीननं यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेतील बाजारावरील विश्वास कमी होणार असल्याचं म्हटलं होतं.