New Zealand PM Jacinda Ardern: न्यूझीलंडच्या पंतप्रधान पुन्हा चर्चेत; जेसिंडा अर्डर्ननी स्वत:चे लग्नच रद्द केले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 10:43 AM2022-01-23T10:43:49+5:302022-01-23T10:44:07+5:30
New Zealand PM Jacinda Ardern Wedding: न्यूझीलंडमध्ये रविवारी रात्रीपासून मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. याशिवाय मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्या शून्यावर नेणाऱ्या, जगातील पहिला देश ठरलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये लग्न समारंभ देखील रद्द करण्याचे निर्बंध आहेत. यामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी स्वत:चे लग्न देखील रद्द केले आहे.
न्यूझीलंडमध्ये रविवारी रात्रीपासून मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. याशिवाय मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे. कार्यक्रमाला केवळ मर्यादित लोकच उपस्थित राहू शकणार आहेत. न्यूझीलंडमध्ये एका लग्न समारंभानंतर ओमायक्रॉनचे ९ रुग्ण सापडले होते. यानंतर तिथे कम्युनिटी स्प्रेडचा धोका होता. एक कुटुंब ऑकलंडहून लग्न समारंभाला जाऊन विमानाने साऊथ आयलंडवर आले होते. या कुटुंबासह फ्लाईट अटेंडंट कोरोना बाधित सापडला. यानंतर न्यूझीलंडमध्ये निर्बंधांची घोषणा करण्यात आली.
नवीन निर्बंधांनुसार, बार आणि रेस्टॉरंट्स आणि लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना परवानगी आहे. याशिवाय कार्यक्रमस्थळी लस घेतली नसेल केवळ २५ लोकच उपस्थित राहू शकतात. याशिवाय मार्च 2020 पासून न्यूझीलंडमध्ये परदेशी नागरिकांसाठी सीमा बंद आहेत. ओमिक्रॉनचे रुग्ण पाहता सरकारने सीमा उघडण्याचा निर्णय पुढे नेला आहे. न्यूझीलंडमध्ये, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येपैकी 94% लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, 56% लोकसंख्येला बूस्टर डोस देखील मिळाला आहे.
अर्डर्न या 2017 मध्ये न्यूझीलंडच्या सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान झाल्या. त्यांनी आपल्या मजूर पक्षाला सर्वात मोठा विजय मिळवून दिला. जॅसिंडा अर्डर्न त्यांचा मित्र क्लार्क गेफोर्डसोबत लग्न करणार आहेत. 40 वर्षीय पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांची 2019 मध्ये टीव्ही होस्ट असलेल्या गेफोर्डशी ओळख झाली होती.