वेलिंग्टन- न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेकिंडा आर्डेर्न या लवकरच सहा आठवड्यांची मातृत्त्व रजा घेणार आहेत. आपण गरोदर असून जून महिन्यापर्यंत आपण कार्यरत राहू असे त्यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यांच्या रजेच्या काळामध्ये उपपंतप्रधान विन्स्टन पिटर्स हे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळतील असेही त्यांनी सांगितले. जेकिंडा 37 वर्षांच्या आहेत.ऑकलंड येथिल निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना जेकिंडा म्हणाल्या, "आपल्या कुटुंबातील येणाऱ्या या नव्या सदस्याची काळजी माझे यजमान क्लार्क गेफोर्ड घेतील. पदावरती असताना आई होण्याची ही जगातील पहिलीच वेळ नाही, याआधीही अशी उदाहरणे घडल्याचे मला माहिती आहे." यापुर्वी 1990 साली पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना बेनझीर भुट्टोसुद्धा आई झाल्या होत्या.जोकिंडा आर्डेर्न गेल्या वर्षी आघाडी सरकार स्थापन करुन सत्तेमध्ये आल्या. गेल्या शंभर वर्षांच्या काळामध्ये झालेल्या पंतप्रधानांमध्ये त्या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या असून. न्यूझीलंडचे नेतृत्त्व करणाऱ्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. जगभरामध्ये काही महत्त्वाच्या देशांमध्ये पंतप्रधानपदी तरुण व्यक्ती बसल्या आहेत. त्यामध्ये कॅनडाचे जस्टीन ट्रुडेऊ, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रोन, आयर्लंडचे लिओ वराडकर यांचा समावेश आहे.