नीरव मोदीचे ब्रिटनमधील 72 कोटींच्या सदनिकेत वास्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 08:57 AM2019-03-09T08:57:38+5:302019-03-09T09:07:05+5:30
नीरव मोदीवर 13700 कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळा केल्याचा आरोप आहे.
ब्रिटन : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना चुना लावून परदेशात पलायन केलेला हिरेव्यापारी नीरव मोदी ब्रिटनमधील वेस्ट एंड भागात तब्बल 72 कोटींच्या आलिशान सदनिकेमध्ये राहत आहे. न्यायालयाच्य आदेशावरून शुक्रवारीच मोदीचा अलिबाग येथील 100 कोटींचा बंगला स्फोटकांनी पाडण्यात आला. इंग्रजी वृत्तपत्र टेलिग्राफनुसार नीरव मोदी या सदनिकेसाठी महिना 15.5 लाक रुपये भाडे देत आहे. भारताने त्याची बँक खाती गोठविली असली, इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस दिली असली तरीही तो खुलेआम व्यवसाय करत आहे.
नीरव मोदीवर 13700 कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडी पैशांची अफरातफर केल्याची चौकशीही करत आहे. त्याने विशेष न्यायालयाला पत्र लिहिले होते, की तो सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येऊ शकत नाही.
टेलिग्राफच्या वृत्तानुसार नीरव मोदी याला ब्रिटनने नॅशनल इंश्योंरेंस नंबर जारी केल आहे. यामुळे तो ब्रिटनमध्ये केवळ व्यवसायच नाही तर तेथील बँकांची खातीही वापरू शकत आहे.
ईडीने प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग न्यायालयात नीरव विरोधात फरारी घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यासाठी न्यायालयाने नीरवच्या वकीलाकडे उत्तर मागितले होते.
मोदीचा १०० कोटींचा बंगला पाडण्याच्या कारवाईचा प्रारंभ, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीअंती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी गेल्या २५ जानेवारी रोजी केला. तेव्हा जेसीबीच्या माध्यमातून हा अत्यंत मजबूत बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे शक्य झाले नाही. परिणामी, तो डायनामाइट्सच्या माध्यमातून स्फोट घडवून जमीनदोस्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. डायनामाइट्स स्फोटांच्या बाबतचे संपूर्ण सुनियोजित नियोजन तज्ज्ञांच्या मदतीने करून शुक्रवारी हा बंगला जमीनदोस्त करण्याचे काम सुरु झाले. कारवाईकरिता ५० तांत्रिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. बंगल्याच्या विविध भागांत एकूण 110 डायनामाइट्स लावण्याचे काम गुरुवारी संध्याकाळीच पूर्ण झाले.
हा बंगला पाडण्यासाठी एकूण 30 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. बंगल्याच्या आजुबाजुच्या लोकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच वाहतुकही पूर्ण बंद ठेवण्यात आली होती.