लंडन - पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात पसार झालेला व्यापारी नीरव मोदीचा ठावठिकाणा सापडला आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याच्या वृत्तास ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तसेच त्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयने योग्य माध्यमातून विनंती केली आहे, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.
नीरव मोदी देशात बराच काळ 'डायमंड किंग' नावाने ओळखला जात असे. फोर्ब्जच्या या जगातील श्रीमंतांच्या यादीत मोदी ८४ व्या स्थानी होता. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यात अडकण्याची चिन्हे दिसू लागताच तो भारताबाहेर पसार झाला होता. तेव्हापासून भारतीय तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, नीरव मोदीविरुद्ध महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) खटला दाखल केला असून, त्यात सूरत येथील न्यायालयाने मोदीविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले आहे. ‘डीआरआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरे तर हे प्रकरण ‘पीएनबी’ कर्जघोटाळ््याच्या बरेच आधाचे आहे. फायरस्टार इंटरनॅशनल, फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल व रॅडाशिर ज्वेलरी या नीरव मोदीच्या तीन कंपन्यांनी ‘ड्युटी फ्री’ पद्धतीने आयात केलेल्या पैलू पाडलेल्या हि-यांची व मोत्यांची हेराफेरी केल्याच्या आरोपावरून हा खटला दाखल करण्यात आला आहे.