बिजींग, दि. 16 - चिनी सैनिकांनी लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाची आपल्याला अजिबात कल्पना नाही असे चीनकडून बुधवारी सांगण्यात आले. सीमेवर शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे चीनने म्हटले आहे. सीमेवर सर्तक असलेल्या जवानांनी मंगळवारी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी बाचाबाचीचे पर्यावसन दगडफेकीच्या घटनेत झाले.
दोन्ही बाजूकडून झालेल्या दगडफेकीमध्ये दोन्ही देशांचे जवान किरकोळ जखमी झाले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या ह्यु च्युनयींग यांना यासंबंधी विचारले असता आपल्याला यासंबंधी काहीही माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. नियंत्रण रेषेजवळ नेहमीच चीनचे सैनिक गस्त घालत असतात असे त्यांनी च्युनयींग यांनी सांगितले. सीमारेषेसंबंधी दोन्ही देशांमध्ये जे करार आहेत त्याचे पालन करण्याची आम्ही भारताला विनंती करत आहोत असे त्या म्हणाल्या.
आणखी वाचा
केरळमध्ये चक्क ड्रिंक अँड ट्रॅ्व्हलवरही' बंदी
'रोहित वेमुला दलित नव्हता, आत्महत्या वैयक्तिक कारणामुळे’
दरम्यान अमेरिकेनेच भारत आणि चीनमध्ये जे वादग्रस्त विषय आहेत, त्या सर्व मुद्यांवर दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढावा असे म्हटले आहे. मंगळवारी भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली आहे.
सिक्कीम सेक्टरमधील डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्य मागच्या अनेक दिवसांपासून परस्परांसमोर उभे ठाकले आहे. त्यानंतर आता लडाखमध्ये संघर्षाची ठिणगी उडाली आहे. भारत आणि चीनने चर्चेतून सामंजस्याने तोडगा काढावा त्यासाठी आम्ही दोन्ही देशांना प्रोत्साहन देत आहोत असे स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या हीथर नॉरेट यांनी सांगितले.
डोकलाम प्रश्नावरुन चीनकडून सातत्याने भारताला युद्धाची धमकी दिली जात आहे. भारताने आपले सैन्य माघारी बोलवावे अन्यथा युद्ध अटळ आहे अशी भाषा केली जात आहे. दरम्यान डोकलाम आमचाच भूभाग असून, डोकलामवरुन आम्ही दावा सोडलेला नाही असे भूतान सरकारने स्पष्ट केले. चीनकडून देण्यात येणारी माहिती पूर्णपणे चुकीची असून, दिशाभूल करणारी असल्याचे भूतानने सांगितले. डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये रस्तेबांधणीवरुन निर्माण झालेला संघर्ष चिघळत चालला आहे.