स्टॉकहोम : मानवी स्वभाव आणि वर्तनाचा त्याच्या निर्णयशक्तीवर व पर्यायाने बाजारपेठांतील व्यवहारांवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करून ‘वर्तनीय अर्थशास्त्र’ (बिहेविअरल इकॉनॉमिक्स) ही अर्थशास्त्राची नवी शाखा विकसित होण्यात मोलाची कामगिरी बजावणारे अर्थतज्ज्ञ डॉ. रिचर्ड एच. थेलेर यांना अर्थशास्त्राचा नोबेल जाहीर झाला.७२ वर्षांचे डॉ. थेलेर अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या ‘बूथ स्कूल आॅफ बिझनेस’मध्ये अर्थशास्त्र आणि वर्तनीय विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. पुरस्कारादाखल त्यांना ९ दशलक्ष स्वीडिश क्राऊन्स एवढी रक्कम मिळेल. रॉयल स्वीडिश अकादमीने हा पुरस्कार जाहीर करताना म्हटले की, मर्यादित विवेकबुद्धी, सामाजिक पगडा आणि स्वनियंत्रणाचा अभाव या मानवी वर्तनाच्या पैलूंचा त्याच्या निर्णयांवर आणि बाजारपेठांवर कसा परिणाम होतो याचा संगतवार अभ्यास करण्याची पद्धत डॉ. थेलेर यांनी प्रस्थापित केली. यामुळे माणसाची निर्णयप्रक्रिया आणि अर्थशास्त्र यांची सांगड घालणारा दुवा तयार झाला. त्यातून वर्तनीय अर्थशास्त्राची नवी शाखा विकसित होऊन त्याचा अर्थशास्त्रीय संशोधन आणि धोरणनिश्चिती यावर मोठा प्रभाव पडला. डॉ. थेलेर यांनी सन २००८ मध्ये कॅस आर. सनस्टीन यांच्यासोबत लिहिलेले ‘नज’ हे पुस्तक जागतिक पातळीवर ‘बेस्टसेलर’ ठरले. यात त्यांनी वर्तनीय अर्थशास्त्राचे सिद्धान्त वापरून समाजाला भेडसावणाºया समस्यांची सोडवणूक कशी केली जाऊ शकते, याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले होते. अर्थशास्त्रासाठी दिला जाणारा हा पुरस्कार सरधोपटपणे नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जात असला तरी इतर पुरस्कारांप्रमाणे सर अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार दिला जाणारा तो मूळ नोबेल नाही.‘स्वेरिग्ज रिक्सबँक स्मृती पुरस्कार’ असे अधिकृत नाव असलेला हा पुरस्कार इतर नोबेल पुरस्कारांनंतर सात दशकांनी म्हणजे सन १९६९पासून सुरू केला गेला. (वृत्तसंस्था)मर्यादित विवेकबुद्धी, सामाजिक पगडा आणि स्वनियंत्रणाचा अभाव या मानवी वर्तनाच्या पैलूंचा त्याच्या निर्णयांवर आणि बाजारपेठांवर कसा परिणाम होतो याचा संगतवार अभ्यास करण्याची पद्धत डॉ. थेलेर यांनी प्रस्थापित केली, त्यासाठी त्यांचा हा गौरव.
‘वर्तनीय अर्थशास्त्रा’चे प्रणेते रिचर्ड थेलेर यांना नोबेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:57 AM