सेऊल, दि, 15 - गेल्या काही दिवसांपासून कोरियन द्विपकल्पासह जागतिक शांततेसाठी आव्हान ठरत असलेल्या उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आगळीक केली आहे. शुक्रवारी पहाटे उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्योंगयोंग येथून जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आले. दरम्यान उत्तर कोरियाच्या शक्तिप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियानेही तातडीने बँलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण केले.
शुक्रवारी उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र उत्तर जपानमधील होकाईदो बेटावरून गेले. उत्तर कोरियाच्या आगळीकीमुळे जपानने आपल्या नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. तसेच जपान आणि दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्राच्या परीक्षणाला दुजोरा दिला आहे.
उत्तर कोरिया लवकरच मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्याच्या तयारीत आहे. आम्ही बनवणा-या मिसाइल जपानवर हल्ला करण्यासाठी सक्षम असून, या मिसाइल अमेरिकन सेनेच्या मुख्य ठिकाणांनाही लक्ष्य करणार असल्याचं उत्तर कोरियानं म्हटलं होतं. उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वीच मिसाइल परीक्षण केले होते. सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं चाचणीदरम्यान 500 किलोमीटरचे अंतर पार करत 560 किलोमीटर उंचावरून मारा केला. त्यानंतर मिसाइल प्रशांत महासागरात प्रवेशकर्ती झाली. या मिसाइलचं परीक्षण किम जोंग ऊन यांच्या देखरेखीखाली झालं. किम जोंग उन हे या मिसाइल परीक्षणामुळे संतुष्ट असून, या प्रकारच्या मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे, असं वृत्त एका स्थानिक वृत्तसंस्थेनं दिलं आहे. KCNAच्या मते, या मिसाइलची लक्ष्य भेदण्याची क्षमता अचूक असून, सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं आमचं सर्वात यशस्वी सामरिक शस्त्र असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच या मिसाइल कोरियन कोरियन द्विपकल्पात तैनात करण्याचेही किम जोंग उन यांनी आदेश दिले आहेत. अमेरिकेनं वारंवार इशारा देऊनही उत्तर कोरियानं स्वतःचं मिसाइल परीक्षण थांबवलेलं नाही. अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या मिसाइल परीक्षणावरून त्यांना इशारा देत सांगितलं होतं की, उत्तर कोरियानं मिसाइल परीक्षण न थांबवल्यास त्यांचाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. उत्तर कोरिया आणि अमेरिकेच्या वादामुळे कोरियन द्विपकल्पाचं पूर्ण क्षेत्र प्रभावित झालं आहे.