Israel-Hamas War: 7 ऑक्टोबर रोजी सुरू झालेले इस्रायल-हमास युद्ध आणखी भीषण झाले आहे. 17 ऑक्टोबर रोजी गाझातील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातून टीका होत आहे. या हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यासाठी इस्रायल आणि हमास, एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान, या हल्ल्यासाठी उत्तर कोरियाने हमासला शस्त्रे पुरवल्याचा दावा केला जातोय.
दक्षिण कोरियाच्या तज्ज्ञांनी काही पुराव्यांच्या आधारे हा दावा केला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांवरून असे दिसून येते की, हे रॉकेट गाझामध्ये नाही, तर उत्तर कोरियामध्ये बनवण्यात आले होते. उत्तर कोरियाच्या शस्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या दोन दक्षिण कोरियाच्या तज्ज्ञांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यासाठी हमासने उत्तर कोरियाचे F-7 रॉकेट ग्रेनेड आणि इतर शस्त्रांचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.
रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड लाँचर्स वॉरहेड फायर करतात आणि त्वरीत रीलोडही केले जाऊ शकतात. गोरिला वॉरसाठी याचा वापर होतो. उत्तर कोरियाने सीरिया, इराक, लेबनॉन आणि गाझातील हमासला F-7 रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड पुरवल्याचा दावा केला जात आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, उत्तर कोरियाने नेहमीच पॅलेस्टिनी गटांना पाठिंबा दिला आहे.
हमासकडे उत्तर कोरियाची शस्त्रे असणे आश्चर्यकारक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. F-7 रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडचा वापर चिलखती वाहनांऐवजी लष्करी लक्ष्ये नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ मंगळवारी पत्रकारांशी भेटले, हल्ल्यात हमासने या शस्त्रांचा वापर केल्याचे त्यांचे मत आहे. पण, उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या तज्ञांचे दावे फेटाळले आहेत.