उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (यूएनएससी) आपल्या एका निवेदनाद्वारे इशारा दिली आहे. हा इशारा उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित आहे. नुकतीच UNSC ची एक बैठक पार पडली. या बैठकीत फ्रान्सने निवेदनाचा मसुदा काही देशांसोबत शेअर केला आहे. यात उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचे पूर्णपणे पालन करत उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्यांवर बंदी घालण्यात यावी, असेही त्यात म्हणण्यात आले आहे. यानंतर उत्तर कोरिया भडकला असून त्याने संयुक्त राष्ट्रांनाच इशारा दिला आहे.
उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी जो चोल सु (Jo Chol Su) यांनी इशारा दिला आहे, की 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला, उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नांचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात, हे समजायला हवे.' सरकारी माध्यमांनुसार, जो चोल सु यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवरही दुटप्पीपणाचा आरोप केला. जेव्हा अमेरिका आणि त्याचे मित्र अशाच शस्त्रांची चाचणी करतात तेव्हा संयुक्त राष्ट्राला तो मुद्दा वाटत नाही, असेही ते म्हणाले.
अमेरिकेविरोधात कडक भूमिका -उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या चाचण्यांसंदर्भात अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने गुरुवारी तातडीची बैठक बोलावली होती. जवळपास सहा महिने शांत राहिल्यानंतर उत्तर कोरियाने सप्टेंबरमध्ये पुन्हा नव्याने विकसित केलेल्या अण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू केली. किम जोंगने अमेरिकेबद्दल कठोर भूमिका स्वीकारली आहे. तो म्हणाला होता, अमेरिकेचा लष्करी धोका अद्यापही कायम आहे. एवढेच नाही, तर आपण आपल्या देशात अण्वस्त्रे वाढविणे सुरूच ठेऊ आणि जोवर अमेरिका तिरस्काराचे धोरण बदलणार नाही, तोवर त्यांच्याशी बोलणी करणार नाही, असेही किम जोंग म्हणाला होता.