सेऊल - कोरियन द्वीपकल्पात सुरु असलेल्या तणावादरम्यान एक मोठी बातमी हाती आली आहे. उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी सायबर हल्ला करत गुपित लष्करी कागदपत्रांसहित युद्धावेळी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने आखलेल्या रणनीतीची चोरी केली आहे. दक्षिण कोरियाच्या एका खासदाराने ही भीती व्यक्त केली आहे. मात्र उत्तर कोरियाने आपण सायबर हल्ला केल्याचा दावा फेटाळला आहे.
मंगळवारी न्यूज एजन्सी यानहप न्यूजने यासंबंधी बातमी दिली. यानहपने दिलेल्या रिपोर्टनुसार, डेमॉक्रॅटिक पक्षाचे ई चॉल यांनी दावा केला आहे की, डिफेन्स इन्टिग्रेटेड डाटा सेंटरमधून लष्करी कागदपत्रांची चोरी झाली आहे. यामध्ये जवळपास 235 गिगाबाईट डाटा होता. एका संरक्षण अधिका-याच्या हवाल्याने त्यांनी ही माहिती दिली.
चोरी झालेल्यापैकी 80 टक्के डाटाची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. ई चॉल यांनी केलेल्या दाव्यानुसार, उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात चोरी केली. मात्र उत्तर कोरियाने सायबर हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने ऑनलाइन हल्ला केल्याचा खोटा आरोप केल्याबद्दल दक्षिण कोरियावर टीका केली आहे.
उत्तर कोरिया व अमेरिकेमध्ये युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही- चीनअमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील धमक्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली होती. जर कोरियन द्विपकल्पात युद्ध झालं, तर कोणीही जिंकणार नाही, असं विधान चीननं केलं होतं.
विशेष म्हणजे उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री यांच्या इशा-यानंतर चीननं विधान करण्यात आलं होतं. त्यामुळे चीनच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, ट्रम्प यांच्या विधानवरून त्यांनी युद्धाची घोषणा केली असून, उत्तर कोरिया या युद्धाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. त्यानंतर चीननंही या वादात युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही, असं स्पष्ट केलं. अमेरिका व उत्तर कोरियाचे राजकर्त्यांना कदाचित हे माहिती असेल की, सैन्याच्या माध्यमातून युद्ध करणं ही व्यवहार्य पद्धत नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त लू कांग म्हणाले.