ऑनलाइन लोकमत
प्याँगयाँग (उत्तर कोरिया), दि. ६ - उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी विध्वंसक अशा हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतल्याचा दावा केला असून आण्विक शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने उत्तर कोरियाचे हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी १० वाजता पेइचिंग येथील केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान ज्या भागात ही चाचणी घेण्यात आली तेथे बॉम्बच्या स्फोटामुळे भूकंप झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेच्या भौगोलिक सर्वेक्षण संस्थेच्या माहितीनुसार, उत्तर कोरियातील काही परिसर ५.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्क्यांनी हादरला. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली त्या पंगेयेरी या ठिकाणापासून भूकंप झालेला परिसर अवघ्या ४९ किलोमीटर अंतरावर असून हा मानवनिर्मित भूकंप असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. दक्षिण कोरिया व जपाननेही हे धक्के भूकंपामुळे नव्हे तर हायड्रोजन बॉम्बच्या चाचणी केल्यामुळे बसल्याचा दावा केला होता. अखेर उत्तर कोरियाने बुधवारी चाचणी घेतल्याचे स्पष्ट केल्यानंतर द.कोरिया व जपानची शंका खरी ठरली. यापूर्वी उत्तर कोरियाने २००६,२००९ व २०१३ अशी तीन वेळा अणुचाचणी घेतली होती आणि आज त्यांनी चौथी यशस्वी चाचणी घेतली.
दरम्यान या चाचणीमुळे इतर देशांच्या चिंता वाढल्या असून आता उत्तर कोरियावर अमेरिकेसह इतर देशांकडून पुन्हा नव्याने निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता आहे. जर उत्तर कोरियाने आण्विक चाचणी केली असेल तर ते संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. तर जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनीही या चाचणीचा निषेध केला असून हा अतिशय गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. दरम्यान उत्तर कोरियाच्या या चाचणीनंतर संयुक्त राष्ट्राने तातडीने बैठक बोलावली आहे.