पाकिस्तानी लष्कराबाबत टिप्पणी करणाऱ्यांवर आता गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 05:30 AM2021-01-04T05:30:10+5:302021-01-04T05:30:20+5:30
पाकिस्तानच्या ११ विरोधी पक्षांची आघाडी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंटने (पीडीएम) मागील काही महिन्यांपासून देशाच्या लष्करावर राजकीय प्रकरणांमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप केला होता.
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये निदर्शने करणाऱ्या विरोधी पक्षांना कडक इशारा देताना गृहमंत्री शेख राशीद अहमद यांनी म्हटले आहे की, देशाच्या लष्कराबाबत अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यांवर ७२ तासांत गुन्हे दाखल करण्यात येतील.
पाकिस्तानच्या ११ विरोधी पक्षांची आघाडी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंटने (पीडीएम) मागील काही महिन्यांपासून देशाच्या लष्करावर राजकीय प्रकरणांमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप केला होता. पीडीएमचा आरोप आहे की, सैन्य दलाने २०१८ मध्ये गैरप्रकार झालेल्या निवडणुकीत कळसूत्री पंतप्रधान इम्रान खान यांना पदावर बसविले आहे.
विरोधकांचे आरोप सरकार कायम फेटाळत असून, आता गृहमंत्र्यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे. देश आणि सरकारी संस्थांच्या विरोधातील दुष्प्रचार खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एक दिवस आधीच पीडीएम प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनी म्हटले आहे की, सशस्त्र दलांनी देशाला बंधक बनविले आहे.
पाकिस्तानी सरकार आणि विरोधक यांच्यात मागील काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. इम्रान खान यांचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून, ते उलथवून टाकण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याची हाक विरोधी पक्षांच्या आघाडीने दिली आहे. यावर सरकारने म्हटले आहे की, तुम्हाला सरकार उलथवून टाकायचे असेल तर संसदेत या तेथे चर्चा करू. लोकशाहीत सरकारविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी संसदेत चर्चा करणे योग्य राहील. हिंमत असेल तुम्ही सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल करा, आम्ही पाहून घेऊ, असे आव्हानही त्यांना सरकारने दिले आहे.