इस्लामाबाद - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिझ सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले आहे. मात्र पाकिस्तानमध्ये राजकारणी आणि लष्कराकडून त्याला मिळत असलेल्या पाठिंब्यात घट झालेली नाही. काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी हाफिझ सईदची बाजू घेतल्यानंतर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हाफिस सईदची तळी उचलताना त्याने प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणेच काश्मीर समस्या सोडवण्यासाठी सक्रिया भूमिका घेतली आहे, असे बाजवा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा सिनेट कमिटीच्या बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारण, दहशतवादविरोधी कारवाई आणि परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवर भाष्य केले. जेव्हा बाजवा यांना देशासाठी संघर्ष करण्यामध्ये हाफिझ सईद याची भूमिका, विशेषकरून काश्मीरप्रश्नी घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता, प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणेच हाफिझ सईद हा सुद्धा काश्मीरचा प्रश्न उपस्थित करू शकतो, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्ऱफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना आणि भारतविरोधी कारवाया करून काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवणाऱ्या लष्कर ए तोयबा आणि जमात उल दावा यांसारख्या दहशतवादी संघटनांबरोबर निवडणुकीसाठी युती करणार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले होते. लष्कर आणि जमात उल दावा या दहशतवादी संघटना देशभक्त असल्याचा उल्लेखही मुशर्रफ यांनी केला होता.
आता पाकिस्तान लष्करप्रमुखांनी दिला हाफिज सईदला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 4:56 PM