जगातील सर्वात मोठी आणि जुनी ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुकला रातोरात बंद करण्यात आलं आहे. 178 वर्षं जुनी असलेली ही ब्रिटिशकालीन टूर ऑपरेटर कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक परिस्थितीशी लढत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीकडे बंद करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं कंपनीच्याच प्रवक्त्यानं सांगितलं आहे. रविवारी रात्री या कंपनीनं गाशा गुंडाळल्यामुळे जवळपास 22 हजार जणांच्या नोकऱ्यांवर कु-हाड कोसळली आहे. ज्यात 9 हजार कर्मचारी हे यूकेतील आहेत. कंपनी बंद झाल्यानं कर्मचारी वर्गच नव्हे, तर ग्राहक, पुरवठादार आणि कंपनीचे इतर भागीदार प्रभावित झाले आहेत. त्यामुळेच थॉमस कुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या पीटर फँकहॉजर यांनी ग्राहक, पुरवठादार आणि कर्मचाही, भागीदारांची माफी मागितली आहे.
- सर्वच उड्डाणे रद्द
यूकेतील नागरी उड्डयन प्राधिकरणा(CAA)नं सांगितलं की, 23 सप्टेंबरपासून सहा ऑक्टोबरपर्यंत नियामक व्यक्ती व सरकार 150000हून अधिक ब्रिटिश ग्राहकांना पुन्हा घरी परत आणण्यासाठी मिळून काम करणार आहोत. सर्वच बुकिंग रद्द करण्यात आल्या आहेत. जगातली ही सर्वात जुनी ट्रॅव्हल कंपनी निधीअभावी आर्थिक परिस्थितीचा मुकाबला करत आहे. या कंपनीनं बँकांकडे अतिरिक्त निधीची मागणी केली होती. परंतु बँकांनी निधी न दिल्यानं अखेर ती कंपनी बंद करण्यात आली आहे.
- आरबीएसनं दिला झटका
रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड (आरबीएस)ने कंपनीला मोठा धक्का दिला आहे. बँकेच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, कंपनीनं 20 कोटी पौंडांची अतिरिक्त निधीची मागणी केली होती. परंतु आरबीएसनं देण्यास नकार दिला. आरबीएस गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीला मदत पुरवत आली आहे.