देशभरात कोरोना व्हायरसनं अक्षरश: थैमान घातलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत लाखो रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये मृतांच्या संख्येत आता घट झाली आहे. कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. स्पेनमध्ये राहणाऱ्या मारिया ब्रायनस यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र मारिया यांनी कोरोनाविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला आहे. मारिया यांचे वय हे ११३ आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळली होती.
त्यानुसार मारिया यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. मे महिन्याच्या सुरूवातीला त्यांच्याववरील उपचार यशस्वीपणे पार पडले आणि टेस्ट केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. वयाच्या ११३ व्या वर्षी वयाच्या कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिल्यानं मारिया यांचे जगभरात कौतुक होत आहे. मारिया यांचे वय जास्त असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची विशेष काळजी घेतली. आज मारिया कोरोनामुक्त झाल्या आहेत. हे देखील एका चमात्कारापेक्षा कमी नाही.
मारियाप्रमाणेच स्पेनमध्ये 101 वर्षांच्या इतर दोन वयस्कर महिलांनीदेखील कोविड-19 वर मात केली आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक संक्रमणाची प्रकरणे आहेत. स्पेन जगातील दुसरा सर्वाधिक कोरोना प्रभावित देश आहे. आतापर्यंत २ लाख ६८ हजार १४३ प्रकरणे आढळली आहेत, तर २६ हजार ७४४ मृत्यू झाले आहेत. इतर देशांप्रमाणे स्पेनमध्येदेखील संसर्ग रोखण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. जोपर्यंत लस तयार होत नाही तोपर्यंत नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे तेथील पंतप्रधानांनी नागरिकांना आवाहन केले आहे.