अमेरिकेतील कुटुंबियांच्या भेटीसाठी B1/B2 व्हिसा मिळवताना त्यांची माहिती अर्जात द्यावी का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 01:40 PM2019-08-17T13:40:40+5:302019-08-17T13:40:52+5:30
व्हिसा मुलाखतीदरम्यान दूतावासातील अधिकारी अमेरिका प्रवासाचा हेतू आणि तुम्ही करत असलेल्या कामकाजाबद्दल, तुमच्या भारतातील कुटुंबाविषयी प्रश्न विचारतील
प्रश्न- मला माझ्या अमेरिकेतील मुलीची आणि नातवाची भेट घ्यायची आहे. त्यासाठी मी बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्यासाठी अर्ज करताना मी माझ्या कुटुंबाची माहिती अर्जात किंवा मुलाखतीत देऊ नये असा सल्ला माझ्या मित्राने दिला. मी कुटुंबाची माहिती दिल्यास माझा अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार असल्याची दूतावासातील अधिकाऱ्यांची समजूत होईल आणि ते व्हिसा नाकारतील, असं मित्र म्हणाला. त्यामुळे मी व्हिसासाठी अर्ज करताना दोन आठवड्यांच्या टूरवर जात आहे, असं सांगावं का?
उत्तर- व्हिसासाठी अर्ज करताना आणि मुलाखत देताना तुम्ही प्रामाणिक उत्तरं घ्यायला हवीत. तुमच्या कुटुंबातील सदस्य अमेरिकेत असल्याने तुमचा नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारला जाणार नाही. अनेकजण बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसाचा वापर अमेरिकेतील त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना भेटायला जाण्यासाठी, त्यांच्याकडे काही दिवस मुक्काम करण्यासाठी करतात.
व्हिसा मुलाखतीदरम्यान दूतावासातील अधिकारी अमेरिका प्रवासाचा हेतू आणि तुम्ही करत असलेल्या कामकाजाबद्दल, तुमच्या भारतातील कुटुंबाविषयी प्रश्न विचारतील. या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं द्या. जर तुम्हाला इंग्रतीत संवाद साधणं जमत नसेल, तर मुलाखतीची वेळ निश्चित करताना योग्य भाषेचा पर्याय निवडा. अमेरिकेच्या मुंबईतील दूतावसात मुलाखतीसाठी इंग्रजी सोबतच हिंदी, गुजराती आणि मराठी भाषेचे पर्याय उपलब्ध आहेत.
व्हिसा अर्ज प्रक्रियेदरम्यान संपूर्ण आणि अचूक माहिती द्या. या प्रक्रियेदरम्यान अनेक टप्प्यांवर तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे याची खात्री द्यावी लागते. सर्वप्रथम तुमचा अर्ज ऑनलाइन जमा करण्याआधी तुम्ही त्यावर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी करता. त्या स्वाक्षरीचा अर्थ तुम्हाला अर्जातील सर्व प्रश्न समजले असून तुम्ही त्या प्रश्नांना योग्य उत्तरं दिली आहेत असा होतो. त्यानंतर तुमच्या मुलाखतीच्या आधी तुमच्या बोटांचे ठसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतले जातात. यावेळी पुन्हा एकदा तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य आहे याची तुम्ही कबुली देता.
प्रमाणिकपणाला पर्याय असू शकत नाही. मुलाखतीदरम्यान तुम्ही माहिती लपवत असल्याचं किंवा प्रश्न टाळत असल्याचं दिसून आल्यास दूतावासातील अधिकाऱ्याला तुमच्या विश्वासार्हतेवर शंका येऊ शकते. याशिवाय एखादी व्यक्ती चुकीची माहिती किंवा कागदपत्रं देताना आढळल्यास त्याच्यावर अमेरिका कायमस्वरूपी बंदी घालू शकते.