पहिला कोरोनाबाधित सापडून उलटले एक वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 05:14 AM2020-11-19T05:14:54+5:302020-11-19T05:16:05+5:30
CoronaVirus News: कोरोनासंकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अमेरिकेसारख्या जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशालाही कोरोनाने जेरीस आणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची घटना उघडकीस येण्याला मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. चीनमधील हुवेई प्रांतात एका ५५ वर्षे वयाच्या व्यक्तीला प्रथम कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. नंतर हळूहळू कोरोनाने चीनमध्ये हातपाय पसरले व तेथून तो जगभरात पोहोचला. आतावर कोरोनाने १३ लाख लोकांचा बळी घेतला आहे.
कोरोनासंकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अमेरिकेसारख्या जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशालाही कोरोनाने जेरीस आणले आहे. आतापर्यंत तेथे अडीच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला चीनच्या हुबेई प्रांतात कोरोनाबाधीत प्रथम आढळून आला असला तरी कोरोना विषाणूच्या साथीबद्दल चीनने खूप उशिरा जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिली.
भारतात ८८ लाख रुग्ण
विषाणू जगात पसरताच चीनमध्ये आश्चर्यकारकरित्या याचा प्रादुर्भाव कमी झाला. चीनमध्ये केवळ ९२ हजार रुग्ण आढळून आले असून साडेचार हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. भारतात ८८ लाख रुग्ण असून एक लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे.