ढाका- अंमली पदार्थांविरोधात बांगलादेशने हाती घेतलेल्या कारवाईत आतापर्यंत 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी आणि तपास संस्थांनी गेल्या पंधरावडाभरात ही कारवाई हाती घेतली आहे. संपुर्ण देशभरात ही मोहीम राबविण्यात येत आहे.हे 105 लोक अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणारे आहेत असे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील गुन्हे अन्वेषण विभाग, शीघ्रकृतीदल तसेच पोलिसांच्या कारवाईत त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र या लोकांच्या मृत्यूवर मानवाधिकार संघटना आणि विविध देशांच्या राजनयिकांनी आता प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या हत्या म्हणजे एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग्ज आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.काल रात्री शीघ्रकृती दल आणि पोलिसांच्या कारवाईत 12 लोकांचे प्राण गेले आहेत. बांगलादेशाच्या पंतप्रधान 15 मे रोजी अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात देशव्यापी कारवाई करणारी मोहीम हाती घेत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र या मोहिमेत मृत्युमुखी पडलेले लोक रस्त्याच्या कडेला खड्ड्यांमध्ये सापडले आहेत. अंमली पदार्थांची कथित तस्करी करणारे हे लोक आमच्या कारवाईत मृत्युमुखी पडले नसून ते त्यांच्या अंतर्गत भांडणांमुळेच मेले आहेत अशी सुरक्षा दलांनी भूमिका घेतली आहे.अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहीम थांबणार नसल्याची माहिती बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी सांगितले. बांगलादेशामध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत नाही मात्र पण गेली काही वर्षे याबा नावाच्या अंमली पदार्थाचे चे केंद्र झाले आहे. याबा या पदार्थाला हॉर्स ड्रग असेही म्हणतात. हा अंमली पदार्थ प्रामुख्याने शेजारच्या म्यानमारमधून बांगलादेशात येतो.
बांगलादेशात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत 105 लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 3:25 PM