अमेरिकेच्या दक्षिण-मध्य भागात असलेल्या टेक्सासमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 18,000 हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एका डेअरी फार्ममध्ये स्फोट होऊन आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेतील फार्मला लागलेली आग ही आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दुसरीकडे, डेअरी फार्मच्या मालकाने या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, डेअरी फार्ममध्ये स्फोट झाला तेव्हा परिसरात धुराचे लोट पसरले होते. कॅस्ट्रो काउंटी शेरीफ कार्यालयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आगीच्या ज्वाला दिसून येत आहेत. या आगीच्या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका व्यक्तीला वाचवले आणि जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळाजवळील शेताकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, गायी एका ठिकाणी दूध काढण्यासाठी एकत्र जमल्या असताना हा स्फोट झाला. गायींच्या मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. उपस्थित लोकांनी सांगितले की, स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला आणि घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर आकाशात काळा धूर दिसत होता.
रॉयटर्सने एडब्ल्यूआयच्या हवाल्याने म्हटले आहे की, अशा इमारतींसाठी केवळ काही अमेरिकेतील राज्यांनी अग्निसुरक्षा कोड स्वीकारला आहे आणि अशा प्रकारच्या आगीपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी देशभरात लागू होणारे कोणतेही संघीय नियम नाहीत. गेल्या दशकात अशा प्रकारच्या आगीत जवळपास 65 लाख प्राणी मरण पावले आहेत.