इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1)(एफ) नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा अर्थ असा की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आता त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणत्याही सार्वजनिक पदाचा कार्यभार सांभाळू शकणार नाहीत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, घटनेच्या अनुच्छेद 62 आणि 63 नुसार दोषी ठरविण्यात आलेली कोणतीही व्यक्ती राजकीय पार्टीचे प्रमुख पद स्वीकारु शकत नाही. यानंतर नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पार्टीच्या अध्यक्ष पदावरुन पाय उतार झाले होते. डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमतीने हा निर्णय दिला आहे. मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी निर्णयाआधी सांगितले की, जनतेला चांगली प्रतिमा असलेल्या नेत्यांची गरज आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने नवाझ शरीफ यांना पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते. तसेच शरीफ यांच्याबरोबर पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनाही अपात्र ठरवले होते.
काय आहे पनामा पेपर लीक प्रकरण? पनामा पेपर लीक प्रकरणात पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची देशा बाहेर मोठी संपत्ती असल्याचे आरोप आहेत. काही वर्षांपूर्वी पनामा पेपर लिक झाल्याची घटना घडली होती. त्यात अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय नेत्यांची देशा बाहेर मोठी संपत्ती असल्याचे उघडकीस आले होते. त्यात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचे देखील नाव सामील आहे. गेल्या वर्षी 4 एप्रिल 2016 रोजी आंतरराष्ट्रीय पत्रकांनी शरीफ यांचे नाव त्यात असल्याचे छापले होते. त्यावर पाकिस्तानात खटला चालवला गेला होता. शरीफ यांच्यारील भ्रष्टाचाराबाबात चौकशीसाठी संयुक्त तपास पथके तयार करण्यात आली होती.