इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानी नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने आता नवीन कसरत सुरू केली आहे. यासाठी लष्कराने देशातील 10 लाख एकरहून अधिक शेतजमीन ताब्यात घेऊन शेती करण्याची तयारी करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने निक्केई एशियाच्या एका अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, पाकिस्तानी लष्कराने गरिबीने ग्रासलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यासाठी सरकारी मालकीच्या मोठ्या भागावर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या वाढत्या वर्चस्वाबद्दल चिंता वाढली आहे.
2024 सालापासून नवीन अन्न सुरक्षा मोहीम सुरू करण्यात येणार असून हे काम नागरी लष्करी गुंतवणूक संस्थेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच, अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, योजनेनुसार लष्कर दिल्लीपेक्षा जवळपास तिप्पट मोठे क्षेत्र म्हणजेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सुमारे 10 लाख एकर जमीन ताब्यात घेईल. दरम्यान, या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये चांगले पीक उत्पादन होईल आणि पाण्याचीही बचत होईल, असे या योजनेला पाठिंबा देणाऱ्यांचे म्हणणे आहे.
निक्केई एशियाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पिकांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातील 20 टक्के रक्कम कृषी संशोधन आणि विकासासाठी ठेवली जाईल. तर उर्वरित भाग लष्कर आणि राज्य सरकारमध्ये समान प्रमाणात विभागला जाईल. मात्र, लष्कराच्या या निर्णयावर अनेकांनी चिंता व्यक्त करत पाकिस्तानातील लष्कर आधीच खूप शक्तिशाली असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत अन्न सुरक्षा अभियानातून मोठा नफा कमावता येऊ शकतो आणि त्यामुळे पाकिस्तानातील करोडो ग्रामीण भूमिहीन गरीबांचे मोठे नुकसान होऊ शकते.
दरम्यान, नुकताच पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत एक अहवाल जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की, सध्या जवळपास 9 कोटी लोक गरिबीने ग्रासले आहेत. तसेच, सुमारे एक वर्षापूर्वी, संयुक्त नागरी-लष्करी गुंतवणूक संस्थेने पाकिस्तानच्या अन्न सुरक्षेसंदर्भात एक योजना सुरू केली होती, जेणेकरून पीक उत्पादन वाढवता येईल.