पाकिस्तानात मागणी, भगतसिंग यांना सर्वोच्च वीरता पुरस्कार द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 06:08 PM2018-01-19T18:08:22+5:302018-01-19T18:16:35+5:30
निशान-ए-हैदर हा पुरस्कार पाकिस्तानात सर्वोच्च मानला जातो. भगतसिंग यांना हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी
लाहोर : शहीद भगतसिंग यांना पाकिस्तानातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पाकिस्तानात जोर धरत आहे. निशान-ए-हैदर हा पुरस्कार पाकिस्तानात सर्वोच्च मानला जातो. भगतसिंग यांना हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी येथील भगतसिंग मेमोरीयल फाऊंडेशनने केली आहे.
भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने पाकिस्तानच्या पंजाब प्रांत शासनाला या संबंधात नव्याने याचिका दिली आहे. 'भगतसिंह यांच्यासारखा शूर व्यक्ती उपखंडात कोणीही झाला नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे संस्थापक कैद-ए-आझम मोहम्मद अली जिन्ना यांनी या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली होती.' असं या याचिकेत म्हटलं आहे.
“भगतसिंग हे आमचे नायक आहेत, त्यांच्या शूरतेबाबत लिहिताना महान पराक्रमी मेजर अजीझ भट्टी यांनी त्यांना आमचे नायक आणि आदर्श असल्याचं घोषीत केलं होतं, त्यामुळे भट्टी यांच्या प्रमाणेच निशान-ए-हैदर मिळण्यासाठी भगतसिंग हे पात्र आहेत, असं भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने म्हटलं आहे. शादमान चौकाला तात्काळ भगतसिंग यांचं नाव दिलं जावं, यासाठी पंजाब सरकारने विलंब करू नये. अशी मागणीही संघटनेने केली आहे.
दुसरीकडे हाफिज सईद आणि त्याचं संघटन शादमान चौकाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करत आहे.