कराची - पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत तर भारतपाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा बंद करेल असा इशारा केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला दिला होता. त्यावर पाकिस्ताने वर्ल्ड बँकेकडे धाव घेतली आहे. दोन्ही देशातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने वर्ल्ड बँकेच्या कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनची मागणी केली आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी पत्रकारांशी बोलताना सिंधू जल करारावरुन भारताने केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या जल करारावर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र भारताकडून या कराराचं उल्लंघन करण्याची भाषा केली जात आहे. भारताकडून होत असलेल्या विधानांचा उल्लेख करत यावर वर्ल्ड बँकेने तोडगा काढावा अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.
केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत बोलताना दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला लक्ष्य केले. गडकरी म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत, तर भारत सिंधू जल करार मोडून पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा बंद करेल. सिंधू जल करारामध्ये अनेक अटी आहेत. दोन्ही देशांमध्ये बंधुत्व वाढावे, शांता प्रस्थापित व्हावी आणि सहकार्य वाढवणे हे या करारामागचे उद्दिष्ट होते. परंतु शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही.
जागतिक बँकेच्या पुढाकारातून भारत आणि पाकिस्तानने १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जल करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार हिमालयात उगम पावणाऱ्या आणि पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या सहा नद्यांपैकी व्यास, रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले, तर सिंधू, चिनाब आणि झेलम पश्चिमेकडील तीन नद्यांमधील पाण्याचा हक्क पाकिस्तानला मिळाला. यामध्ये भारताच्या वाट्याला ३३ दशलक्ष एकर-फूट, तर पाकिस्तानच्या वाट्याला ८० दशलक्ष एकर-फूट पाणी आले. हे वाटप समन्यायी नसल्याने, भरपाई म्हणून भारताला पाकिस्तानच्या वाट्याच्या तीन नद्यांमधील पाण्याचा सिंचनासाठी मर्यादित आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी अमर्यादित वापर करण्याचा अधिकार देण्यात आला. दुर्दैवाने भारताने आतापर्यंत स्वत:च्या वाट्याला आलेल्या पाण्याचाही पूर्णपणे वापर केला नाही.
पुलवामा हल्ल्यानंतरही नितीन गडकरी यांनी पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी रोखण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सिंधू जल करार पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यावेळी भारताने पाणी अडवले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानकडूनही आली होती. मात्र जर भारताने पाणी रोखले तर पाकिस्तानची गोची होईल हे लक्षात आल्यानेच पाकिस्तानची पळापळ झाली आहे.