इस्लामाबाद, दि. 3 - हुकूमशहा आणि लष्करी सरकारने नेहमीच देशाचं भलं केलं असून योग्य मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे. मात्र लोकनियुक्त सरकार सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व गोष्टींचा विनाश झाला असं पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ बोलले आहेत. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत तीन वेळा लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. परवेझ मुशर्रफ यांनी बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं असल्याचं वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिलं आहे.
'लष्करी सरकारने नेहमीच देशाला योग्य मार्गावर नेण्याचं काम केलं. मात्र लोकनियुक्त सरकारने रुळावरुन जाणारी गाडी खाली आणली', असं मुशर्रफ बोलले आहेत. 'हुकूमशहांनी देशाला योग्य मार्ग दाखवला. देशात लष्कराची सत्ता असताना नेहमीच विकास झाला', असल्याचा दावा मुशर्रफ यांनी यावेळी केला. 'सोबतच देशातील नागरिकांना जोपर्यंत विकास होत आहे तोपर्यत सत्ता कोणाच्या हातात आहे याचा काहीच फरक पडत नाही', असंही ते बोलले आहेत.
1999 मध्ये लष्कराकडून करण्यात आलेल्या राजकीय बंडखोरीबद्दलही यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मुशर्रफ यांनी पाकिस्तानमधील नागरिकांची इच्छा होती म्हणूनच तो उठाव करण्यात आल्याचा दावा केला. 'देशातील नागरिकांना हवा होता म्हणूनच तो उठाव करण्यात आला होता', असं मुशर्रफ बोलले आहेत. मुशर्रफ यांनी 12 ऑक्टोबर 1999 रोजी नवाझ शरीफ यांच्या सरकारविरोधात लष्करी उठाव करत सत्तेची सूत्रं हाती घेतली होती.
'पाकिस्तान जेव्हा संकटात होता तेव्हा देशातील नागरिकांनी लष्कराकडे धाव घेत मदत करण्याची मागणी केली होती. जेव्हा कधी पाकिस्तानात मार्शल लॉ लागू करण्यात आला, तेव्हा ती काळाची गरज होती', असं मुशर्ऱफ बोलले आहेत.
' पाकिस्तानच नाही तर आशियातील कोणत्याही देशाकडे पाहिलंत, तर ज्या देशांमध्ये हुकूमशाही होती त्यावेळी त्यांनी ख-या अर्थाने प्रगती केली. आशियातील सर्व देशांनी हुकूमशाहीमुळे विकास पाहिला आहे. हुकूमशहा आणि लोकनियुक्त सरकार असलेल्या देशांची तुलना करुन पाहिलंत तर हुकूमशहा असलेल्या देशांनी समृद्धीकडे वाटचाल केल्याचं लक्षात येईल', असं परवेझ मुशर्रफ बोलले आहेत.
'संविधान वाचवण्याच्या नावाखाली आपण देशाची विल्हेवाट लावू शकत नाही. देशासाठी संविधानाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल', असं मत परवेझ मुशर्रफ यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी मात्र परवेझ मुशर्रफ यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे.