पाकिस्तानला आता त्यांनी पोसलेला दहशतवादच पोखरू लागला आहे. सिंध प्रांतामध्ये मुलांना रॉकेट लाँचरचे गोळे मिळाले होते. त्याच्याशी खेळत असलाना मोठा स्फोट झाला. यामध्ये पाच मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
काशमोर जिल्ह्यातील खंदकोट तहसीलमध्ये राहणाऱ्या मेहवाल शाहच्या घरात हा स्फोट झाला आहे. तेथील पोलिस अधिकाऱ्याने पाच मुले, दोन महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तर एक महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेला कंधकोट येथून लारकाना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मृत आणि जखमी एकाच कुटुंबातील आहेत. मुलांना खेळताना रॉकेट सापडले आणि ते त्यांनी घरी आणले होते. रॉकेट लाँचर झांगी सबझवाई गावापर्यंत कसे पोहोचले याचा तपास केला जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे. कच्छ (नदी) भागात शस्त्रास्त्रांचा साठा तस्करी केला जात होता का? याचाही तपास केला जात आहे.
अशाच धोकादायक वस्तूंशी मुले खेळत असल्याचा घटना या भागात यापूर्वीही घडल्या आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये चमनच्या हद्दीत ग्रेनेड स्फोटात एका मेंढपाळाचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी एका पडक्या कंपाऊंडमध्ये सापडलेल्या वस्तूशी खेळताना झालेल्या स्फोटात तीन मुलांचा मृत्यू झाला होता.