तालिबाननेअफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानात गेलेल्या 200 हून अधिक अफगाण नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, हे सर्वजण त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे घुसले होते.
दरम्यान, तालिबाननेअफगाणिस्तान काबीज केल्यानंतर, येथील हजारो लोक देश सोडून जात होते. अफगाणिस्तानमधील विविध भागातून मोठ्या संख्येने लोक पाकिस्तानच्या सीमेवर पोहोचले आणि चमन परिसराजवळ थांबले. याठिकाणी शेकडो लोकांनी रेल्वे स्थानकावर आपला वेळ घालवला.
पाकिस्तानी मीडियानुसार, येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणत्याही अफगाण नागरिकाला पुढील भागात प्रवेश करू दिला नाही. काही अफगाण नागरिक क्वेट्टापर्यंत पोहोचले होते, पण पाकिस्तानी पोलिसांनी त्यांना शोधून ताब्यात घेतले.
(अमेरिकेने ज्याच्यावर ५० लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले, त्या हक्कानीला तालिबानने बनवले गृहमंत्री)
DAWN वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आता अशा 200 पेक्षा जास्त नागरिकांना अफगाणिस्तानात परत पाठवले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ते बेकायदेशीरपणे पाकिस्तानात दाखल झाले होते, त्यामुळे त्यांना परत पाठवण्यात आले आहे.
अफगाणिस्तानातून मोठ्या संख्येने लोक पाकिस्तानात आले आहेत, परंतु ज्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा आहे त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये जवळपास 3 मिलियन अफगाण नागरिक राहतात. गेल्या वर्षांमध्ये याठिकाणी मोठ्या संख्येने अफगाण नागरिक पोहोचले होते.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर काबूल विमानतळावरून मोठ्या संख्येने लोक देश सोडून गेले आहेत. अमेरिकन सैन्याच्या नेतृत्वाखालील बचाव कार्यात दीड लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, अमेरिका गेल्यापासून काबूल विमानतळ बंद आहे.