Pakistan Election 2018: पीटीआय सर्वात मोठा पक्ष; इम्रान खान पंतप्रधान होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 06:51 AM2018-07-26T06:51:22+5:302018-07-26T07:54:47+5:30
इम्रान खान यांचा पक्ष बहुमतापासून दूर
इस्लामाबाद: पाकिस्तानात काल सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झालं. यानंतर रात्रीपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यामध्ये सुरुवातीपासूनच इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षानं आघाडी घेतली आहे. माजी क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तानातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.
पाकिस्तानात काल 272 जागांसाठी मतदान झालं. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार इम्रान खान यांच्या पीटीआयला 119 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीएमएल 56 जागांवर आघाडीवर आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी तिसऱ्या स्थानावर आहे. पीपीपी 34 जागांवर पुढे आहे. याशिवाय 58 जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईददेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. मात्र त्याच्या मिल्ली मुस्लिम लीगला एकाही जागेवर आघाडी मिळालेला नाही.
#PakistanGeneralElections: As per the latest unofficial trends on ARY news, PTI is leading on 114 seats and PMLN on 63 seats pic.twitter.com/KClIXUqrrq
— ANI (@ANI) July 26, 2018
मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पीटीआयनं आघाडी घेतली. यानंतर नवाज शरीफ यांच्या पीएमएल पक्षाकडून निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. नवाज शरीफ यांचा लहान भाऊ शहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषद घेत इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले. पाकिस्तानात आता झालेली निवडणूक ही इतिहासातील सर्वात अप्रामाणिकपणे लढवण्यात आलेली निवडणूक असल्याचं शरीफ म्हणाले. आम्ही या निवडणुकीचे निकाल स्वीकारत नाहीत. आम्हाला ते मान्य नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. 'इम्रान खान यांनी गैरमार्गाचा वापर करुन आघाडी घेतली आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणांवरुन बाहेर काढण्यात आलं आहे. मतमोजणीत मोठा घोटाळा करण्यात आला आहे,' असा आरोप शहबाज शरीफ यांनी केला.