गेल्या काही दिवसापासून पीओकेमध्ये लोकांनी आंदोलन सुरू आहे. वाढत्या महागाईवरुन जनतेचा संताप शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, आता या हिंसक आंदोलनापुढे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले आहेत. शेहबाज शरीफ सरकारने तात्काळ पीओकेसाठी २३ अब्ज रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. स्थानिक सरकारनेही विजेचे दर आणि ब्रेडच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे.
पीओकेमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. शुक्रवारपासून या भागात निदर्शने होत आहेत. सोमवारी सलग चौथ्या दिवशीही पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. यामध्ये दोन आंदोलक आणि एका एसआयचा समावेश आहे. रविवारी झालेल्या गोंधळात १०० हून अधिक जण जखमी झाले.
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
गेल्या चार दिवसांपासून पीओकेमधील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि वकिलांनी स्थापन केलेल्या संयुक्त अवामी कृती समितीने जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि कर वाढीविरोधात राजधानी मुझफ्फराबादपर्यंत मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. सोमवारीही लाखो आंदोलकांनी मुझफ्फराबादकडे लाँग मार्च सुरूच ठेवला होता. मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. रविवारी गर्दीत पोलीस एसआय अदनान कुरेशी यांची गोळ्या घालून हत्या केली. या गोंधळात १०० हून अधिक जण जखमी झाले. त्यात बहुतांश पोलीस होते.
भिंबरहून निघालेला आंदोलकांचा ताफा सोमवारी दिरकोटहून मुजफ्फराबादमध्ये दाखल झाला. हे आंदोलक मुझफ्फराबादमध्ये विधानसभेला घेराव घालणार आहेत. पीओकेमध्ये चौथ्या दिवशीही इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद होती. दरम्यान, आंदोलकांना शांत करण्यासाठी, पाकिस्तान सरकारने तात्काळ प्रभावाने २३ अब्ज रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे. निदर्शनांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही सक्रिय झाले असून त्यांनी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी आंदोलक आणि स्थानिक सरकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पीओकेसाठी २३ अब्ज रुपयांच्या बजेटला तत्काळ प्रभावाने मंजुरी दिली.