सैरभैर पाकिस्तानकडून काश्मीरबाबत होणार मोठा निर्णय; पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 01:43 PM2019-08-17T13:43:15+5:302019-08-17T13:43:47+5:30
Kashmir Issue: भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले जाणार आहेत.
इस्लामाबाद - काश्मीर प्रकरणावरुन सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर पाकिस्तान सरकारकडून उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सध्या पाकिस्तानात सुरु आहे. या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा होणार आहे. या बैठकीवर भारताची करडी नजर असणार आहे कारण यामध्ये पाकिस्तानची पुढील रणनीती काय असेल यावर निर्णय होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत पाकिस्तानकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान तोंडघशी पडलं. त्यामुळे हताश झालेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ही महत्वपूर्ण बैठक बोलविली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर मुद्दा घेऊन जाण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र चीन सोडून कोणत्याही देशाने पाकिस्तानला समर्थन दिलं नाही. त्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी ही बैठक महत्वाची आहे. या बैठकीत पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.
And the UNSC meeting was a reaffirmation of these resolutions. Therefore addressing the suffering of the Kashmiri people & ensuring resolution of the dispute is the responsibility of this world body.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 17, 2019
या बैठकीबाबत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहबूब कुरैशी यांनी सांगितले की, काश्मीर मुद्द्यावर भविष्यात काय रणनीती आखायची आहे यावर पंतप्रधान इम्रान खान यांनी ही उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे. या बैठकीत पाकिस्तानमधील राजकीय पक्षाचे नेते तसेच सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित असणार आहेत. बैठकीला उपस्थित असणारे सर्वजण या मुद्द्यावरुन आपापली मते मांडतील. यामधून काश्मिरी लोकांची मदत आणि समर्थन करण्यासाठी पाकिस्तानकडून पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे असं सांगितलं आहे.
काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तान आणि चीन हे संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत तोंडावर आपटले आहेत. उलट या बैठकीत काश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याबाबत भारताचं कौतुक करण्यात आलं. या बैठकीबाबत अधिकृत प्रतिक्रिया जारी करण्यात आली नाही. मात्र बंद दरवाज्यामागे झालेल्या या बैठकीत भारताची कुटनीती समोर आली. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांच्या हजरजबाबी, तथ्य आणि कुटनीतीच्या उत्तरांनी पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद केली होती.