भारताचे ते विमान पाडण्यामागे आमचा हात नाही, पाकिस्तानचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 02:46 PM2019-02-27T14:46:54+5:302019-02-27T14:47:39+5:30
भारतीय हवाई दलाचे मिग - 17 विमान सकाळी काश्मीरमधील बडगाम येथे अपघातग्रस्त झाले होते. दरम्यान, हे विमान पाकिस्तानच्या हल्ल्यात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा करण्यात येत होता.
इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाचे मिग - 17 विमान सकाळी काश्मीरमधील बडगाम येथे अपघातग्रस्त झाले होते. दरम्यान, हे विमान पाकिस्तानच्या हल्ल्यात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पाकिस्तानने या प्रकरणी स्पष्टीकरण देत बडगाममध्ये भारतीय हवाई दलाच्या अपघातग्रस्त झालेल्या विमानामागे आपला हात नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफुर म्हणाले की, ''भारतीय हवाई दलाचे विमान बडगाम येथे कोसळल्याचे वृत्त आहे. मात्र यामागे पाकिस्तानचा हात नाही.'' बडगाम जिल्ह्यातील कलान गावात लढाऊ विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच ऑपरेशन टीम घटनास्थळी दाखल झाली असून अपघातग्रस्त विमानातून दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. दरम्यान, याबाबत अद्याप अधिक माहिती मिळाली नाही.
दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.